पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मदतीनें घरगुती उद्योगाचें काम चालू ठेवतां येतें व त्या कामदाराचें उत्पन्न अजीबाद बंद होत नाहीं. परंतु विराटस्वरूपी उद्योगपद्धतीत मजुरी बंद ह्मणजे सर्व उत्पन्न बंद. तेव्हां या पद्धतींत मजुरानें जर कांहीं शिल्लक टाकली असेल तरच त्याचे वार्धक्यामध्यें किंवा आजारीपणा व अपघातांत बऱ्या तर्हेनें दिवस जाणार; परंतु मजुरांची मजुरी साधारण बेताचीच असल्यामुळे व देशाच्या भरभराटीबरोबर आयुष्याच्या आवशकांना जास्त खर्च लागू लागल्यामुळें मजुरांची फारशी शिल्लक राहण्याचा संभव नाही व या कारणामुळेच विराटस्वरूपी कारखान्याच्या पद्धतीत मजूरवर्गाची दैन्यावस्था होते. तेव्हां ही दैन्यावस्था काढून टाकणें अवश्य आहे व हे काम सरकारचेंच आहे, अशी सल्ला वागनरनें प्रिन्स बिसमार्क यास दिली व त्या अनुरोधानेंच जर्मनीमध्यें विम्यासंबंधींच्या कायद्याची प्रसिद्ध त्रयी पास झाली. पहिला विम्याचा कायदा आजारीपणाबद्दल होता व ती प्रथमतः १८८३ मध्यें पास झाला. या कायद्यान्वयें आजारीपणाबद्दल प्रत्येक कामदाराचा विमा उतरलाच पाहिजे असा सक्त नियम झाला. विमा उतरण्यास लागणा-या रकमेंपैकीं दोनतृतीयांश कारखानदारानें दिले पाहिजेत व एकतृतीयांश मजुरानें दिले पाहिजेत असें कायद्याचें कलम होतें. आजारपणाच्या तिस-या दिवसापासून या विम्यांतून मजुरीच्या अर्धे पैसे मिळावयाचे व हा क्रम तेरा आठवडे चालावयाचा. त्याच्यापुढें मजुराचा आजार राहिल्यास अनाथालय-फंडामधून पुढे त्याची तजवीज करावयाची. अपघाताबद्दलच्या विम्यासंबंधींचा कायदा १८८४ मध्यें पास झाला.या कायद्यान्वयें गिरणीतील किंवा कारखान्यांतील अपघाताची सर्व जबाबदारी कारखानदारांवर टाकलेली आहे. अर्थातू ज्याप्रमाणें आपला कारखाना आरोग्यकर स्थितीत ठेवणें हें कारखानदारांचें काम आहे त्याचप्रमाणे अपघातापासून मजुरांचा बचाव करणें हेंही कारखानदारांचेंच काम आहे; म्हणून या विम्याची सर्व रक्कम कारखानदारांकडून घ्यावयाची असा या कायद्यानें निर्बंध केला. परंतु या कायद्याच्या त्रयींपैकी सर्वांत महत्वाचा कायदा म्हणजे वार्धक्याबद्दलच्या विम्याचा कायदा होय. हा कायदा १८८९ मध्यें पास झाला. या कायद्याप्रमाणें मजुराला ७० वर्षे पुरीं झालीं म्हणजे