पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२५१] प्रमाणें खासगी रीतीनेंसमाज स्थापन करण्याच्या खटपटी झाल्या परंतु त्याला म्हणण्यासारखे यश आलें नाहीं. फरडिनंड लॅझेली हा जर्मन सामाजिक पंथाचा मोठा पुरस्कर्ता होता. लैप्सिक येथें भरलेल्या गरीब लोकांच्या परिषदेच्या अध्यक्षाचा मान त्यास मिळाला होता. अभिमतपथानें प्रस्थापित केलेल्या मजुरीच्या नियमापासून आपली सुटका करून घेण्याच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे सार्वत्रिक मताधिकार ही होय. ही मागणी मजुरांच्या तर्फेनें त्यानें प्रथमतः याच परिषदंत केली. कारण मजुरांना असा मताधिकार मिळाला म्हणजे भांडवलवाल्यांच्या जुलुमापासून आपली सुटका करून घेण्यासाठीं मजूरवर्गाला भांडवल सरकारी तिजोरीतून देण्याला सरकारला भाग पाडतां येईल असें त्याचे होतें. लॅझेलीनें १८६३ मध्यें मजुरांची एक प्रचंड संस्था निर्माण केली. त्याच्या परिश्रमानें जर्मनीमध्यें सामाजिक पंथाला फार जोर आला. त्यानें या विषयावर पुष्कळ लिहिले आहे त्यांतून त्याच्या मताचा खालीं दिलेला मथितार्थ निघतो. लॅझेलीच्या मताप्रमाणें अर्वाचीन युरोपच्या इतिहासाचे तीन भाग पडतात. पहिलें युग जहागिरीयुग होय. त्याचा काळ १७८९ पर्यंतचा आहे. या काळांत सर्व सार्वजनिक सत्ता समाजांतील जमीनदार वर्गाच्या हातीं होती व तिचा उपयोग हा वर्ग आपल्या स्वतःच्याच हिताकरितां करीत असे. हा काळ त्या वर्गाच्या हक्काचा व सवलतीचा काळ होता. इतर सर्व प्रकारच्या श्रमाबद्दल व धंद्याबद्दल तुच्छताबुद्धि होती. कामकरी लोकही जमीनदारांचे बहुतेक गुलामच होते. सारांश, या काळांत सर्व सत्ता, सर्व मान, सर्व कांहीं जमीनदारांना होतें, कामकऱ्यांना यांपैकी कांहीं एक नव्हतें. १७८९ पासून १८४८ च्या दुस-या काळाला नागरिक काळ म्हणता येईल. या काळांत जंगम मालमत्तेला स्थावर मिळकतीच्या इतका मान मिळू लागला. परंतु अजूनही अधिकार व सत्ता ही मनुष्याच्या अंगच्या गुणाऐवजी त्याच्या मालमत्तेवरून ठरलीं जात असत. या काळा नागरिक वर्गाच्या हिताकरितां कायदे केले जात असत, जो जन्माला येण्याची व कायदेशीर होण्याची धडपड करीत आहे, असा कामदाराचा काळ १८४८ पावून सुरू झाला आहे असे म्हणण्यास