पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २४६] बहुजनसमाजांतील गरीब लोकांची स्थिती पुष्कळ बाबतींत सुधारण्यासारखी आहे. तेव्हां समाजांतील औद्योगिक पद्धतीनें उत्पन्न झालेल्या असमतेची जितकी तीव्रता कमी करणें शक्य आहे तितकी तीव्रता कमी करणें हा राष्ट्रीय सामाजिक पंथाचा कार्यभाग आहे. व्यक्तिक सामाजिक पंथ व्यक्तींच्या आपखुषीनें व इतर खासगी खटपटीनें या बाबतींत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो;तर राष्ट्रीय सामाजिक पंथाचा भरवंसा देशाचें सरकार व कायदा या दोहोंवर फार आहे.व्यक्तीच्या जीविताचें व मालमत्तेचें संरक्षण करणें इतकेंच सरकारचें कर्तव्यकर्म आहे असें नाही; तर बहुजनसमाजाला सुख देणें व त्याला सुस्थितीत आणणें हेंही सरकारचें कर्तव्यकर्म आहे. असे या पंथाला वाटतें व हें घडवून आणण्यास कायद्यासारखें दुसरें अमोघ शस्त्र नाहीं व म्हणून या शस्त्राचा सरकारनें खुल्या दिलानें व सढळ हातानें उपयोग केला पाहिजे असें या पंथाचें म्हणणें आहे.

शांततामूलक सामाजिक पंथाच्या तिसऱ्या पोटभेदाचें नांव समाईक पंथ हें होय. राष्ट्रीय पंथाप्रमाणेंच या पंथाला असें वाटतें कीं, समाजांतील संपत्तीच्या वांटणीची विषमता विराटस्वरूपी कारखान्याच्या पद्धतीनें निर्माण होते व विराटस्वरूपी कारखाने देशांतील भांडवल व जमीन-संपत्तीच्या उत्पत्तीचीं दोन साधनें-हीं थोडयाश लोकांच्या हातीं गेल्यामुळें होतात. याप्रमाणें भांडवल व जमीन हीं देशांतील लहानशा वर्गाच्या हातीं सर्वस्वी गेल्यामुळें व या भांडवलाखेरीज व जमिनीखेरीज मजुरांना आपल्या श्रमाचा उपयोग करतां येत नसल्यामुळे मजुरांच्या श्रमाचें फळ त्यांचेपासून या भांडवलवाल्या व जमीनदारवर्गाला बुचाडून घेतां येतें. तेव्हां सर्व भांडवल व देशांतील सर्व जमीन हीं खासगी व्यक्तीच्या हातांत असतां कामा नये. तर सर्व प्रकारचें भांडवल व जमीन यांवर राष्ट्रीय मालकीच पाहिजे. म्हणजे या पंथाच्या मतें सर्व कारखाने व धंदे हे राष्ट्रीय किंवा सरकाच्या मालकीचे झाले पाहिजेत. अर्थात सर्व उद्योगधंदे हे सरकारचीं निरनिराळीं खोतीं झाली पाहिजेत. असें झाले असतनां प्रत्येक मनुष्याला आपापल्या गुणाप्रमाणें व कर्तबगारीप्रमाणें संपत्तीचा वांटा मिळेल. या पद्धतींत सर्व कारखाने सरकारी बनून प्रत्येक मनुष्य सरकारी नोकर बनावयाचा म्हणजे कोणालाही काम केल्याखेरीज उत्पन्न मिळणार नाहीं व संपत्तीची वांटणी समतेवर होईल. उप-