पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २३७] फायदा काय आहे हें पहाण्याकरितां यांतील प्रत्येक पदाचा थोडासा विचार कला पाहिजे. पेढ्यांचें स्वरूप, त्यांची कामगिरी व त्यांचा औद्योगिक परिणाम पुढील पुस्तकांत वर्णन करावयाचा आहे. परंतु सध्यां आपण या संस्थांची व्यावहारिक माहिती गृहीत धरून चालूं. या पेढ्या फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा व्यापार करतात. या व्यापा-यांस पैसे कर्जाऊ देतात. या लोकांच्या ठेवी घेतात. परंतु या मोठमोठ्या व प्रचंड प्रमाणावर चाललेल्या पेढ्यांचा खेड्यांत रहाणा-या व अत्यंत गरीब लोकांना फायदा करून घेतां येत नाहीं. कारण या पेढ्या मोठ्या श्रीमंत व पतवाल्या लोकांना गहाणावर वगैरे पैसे देतात. परंतु गरीब माणसाला पतच नसते. कारण पत ह्मणजे आपल्याजवळ असलेली स्थिर अथवा स्थावर मिळकत व भांडवल यांच्या जोरावर रोख कर्ज मिळण्याचें व ठरल्या वेळीं तें कर्ज परत करण्याचें सामर्थ्य होय. आतां अत्यंत गरीब लोकांजवळ अशी स्थावर मिळकत किंवा स्थिर भांडवल थोडेंच असतें. यामुळें त्यांना अशा लोकांकडून कर्जाऊ पैसे मिळणें शक्यच नसतें. कारण पेढीवाल्यांना पटणारी अशी पत या लोकांची नसते. तेव्हां अशा गरीब शेतक-यांना व गरीब कामगारांना जर कर्जाऊ पैसे काढण्याचा प्रसंग आला तर त्यांना जबर व्याजानें पैसे काढावे लागतात. कारण आपले पैसे परत येतील किंवा नाहीं अशी सावकारांस खात्री नसते व ज्याप्रमाणें धोक्याच्या किंवा सट्टयाच्या व्यापारांत मनुष्य जास्त नफ्याच्या आशेनंच फक्त पडतो त्याप्रमाणें अशा लोकांना जास्त व्याजाच्या लालुचीनेंच सावकार कर्ज देण्यास तयार होतात. परंतु अशा जबर व्याजाच्या कजांच्या पायीं हे गरीब लोक अगदीं चिरडून जातात. व त्यांची दिवसेंदिवस जास्तच वाईट स्थिात होत जाते. तेव्हां याची सुधारणा होण्यास त्यांना फार हलक्या व्याजानें उत्पादक कामाकरितां पैसे मिळाले पाहिजेत; ह्मणजे ते व्याजापायीं बुडणार नाहींत व त्यांच्या शेताचें किंवा धंद्याचें उत्पन्न वाढून त्यांना सवलतीनें कर्ज व व्याज परत करून देतां येईल. असें झालें ह्मणजे त्यांची स्थिति दिवसेंदिवस सुधारत जाईल. परंतु त्यांना हलक्या व्याजानें पैसे मिळण्यास त्यांची पत वाढली पाहिजे. तेव्हां प्रत्यक्ष मालमत्ता जास्त वाढलेली नसतांना त्यांची पत वाढवावयाची कशी हा प्रश्न बिकट कोड्यासारखाच प्रथ-