पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/239

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२९]

असा अनुभव आहे कीं , सहकारी दुकानांत भांडवलाचें दर वर्षात दहा वेळ परिवर्तन होतें. ह्मणजे इतर व्यापारापेक्षां यांत दसपट फायदा होतो . तिसरें, रोखीचा व्यवहार असला ह्मणजे उसनवार माल विकत घ्यावा लागत नाही; यामुळे माल स्वस्त पडतो इतकेंच नाही तर बाजारांतला उत्तम मालही घेतां येतो. मजुरांची सांपत्तिक स्थिति बिघडविणारी उधारीइतकी दुसरी वाईट गोष्ट नाहीं. कारण उधारीच्या पद्धतीनें मजुरांमध्यें उधळेपणा शिरतो व मजूर व्यापा-याच्या अगदीं कह्यांत सांपडतो. यामुळे त्याला एकाच व्यापा-याशीं व्यवहार करावा लागतो व त्याला माल महाग पडून वाईट मालसुद्धां पत्करावा लागतो. तेव्हां सहकारी दुकानांना रोखीचें तत्व फारच फायदेशीर आहे व त्यानें मजूरवर्गाला काटकसरीचा गुण शिकविला जातो असें ह्मणण्यास हरकत नाहीं.
 रॉचडेल पायोनियर्सच्या आश्चर्यकारक सिद्धीनें सहकारी दुकानाचें तत्व सर्व इंग्लंडभर पसरलें. अशा तत्वावरील दुकानें सर्व शहरांतच झाली असें नाहीं तर लहान लहान खेड़यांतही तीं दिसुं लागलीं. इतका त्यांचा झपाट्याने प्रसार झाला. कांहीं सहकारी दुकानांत नफा तीमाहीनें न वांटतां मालाच्या कमी किंमतीच्या रूपानें दिला जात असे. परंतु ही पद्धति काटकसरीला उत्तेजक नाहीं. या संबंधांत रॉचडेलपद्धतिच जास्त हितकारक आहे यांत शंका नाहीं.
 आतांपर्यंत वर्णन केलेलें सहकारी तत्व ह्मणजे संपत्तीच्या वांटणीसंबंधींचें झालें. परंतु हें सहकारी तत्व संपत्तीच्या उत्पत्तीसंबंधींही अंमलांत आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. तेव्हां त्याचाही येथें थोडा विचार करणें जरूर आहे.
 अर्वाचीन संपत्तीच्या उत्पादनपद्धतींत कारखानदार, भांडवलवाले व मजूर असे निरनिराळे वर्ग झालेले आहेत व समाजाच्या औद्योगिक उन्नतीबरोबर असा पारिणाम होणें अपरिहार्य आहे हें मागें दाखविलें आहे. परंतु या पद्धतीमध्यें मजुरांच्या श्रमाला योग्य मोबदला' मिळत नाही व भांडवलाला मात्र वाजवीपेक्षां जास्त मोबदला मिळतो. आतां अर्वाचीन काळीं भांडवल व श्रम यांमध्यें जो विभक्तपणा झालेला आहे तो काढून टाकण्याच्या हेतूनें उत्पादक सहकारी तत्व पुढें आलेलें आहे. सहकारी तत्वावरील कारखान्यांत मजूर व भांडवलवाले व कारखानदार