पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/222

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२१२]

काळांत मालाचं दर, धंदेवाल्याची मजुरी व नफा हीं रूढीनें किंवा कायद्यानें ठरलेलीं असत. त्यांत चढाओढीचा किंवा कराराचा किंवा घासाघीसीचा सबंध नव्हता. परंतु शास्त्रीय शोधांनीं व यंत्रांच्या प्रगतीनें जेव्हां धंद्याचें घरगुती वामनमूर्ति स्वरूप जाऊन त्याला कारखान्याचें विराट स्वरूप आलें तेव्हां पूर्वींची सर्व परिस्थिति बदलली. रुढेि जाऊन तेथें चढाओढ आली; कायदा जाऊन करार आला; ठरीव रुळी जाऊन बाजारांतील घासाघीस आली; स्वतंत्र छोटेखानी कामगार जाऊन त्यांऐवजीं कारखानदार व मजूर असे दोन विरोधी वर्ग आले; शेवटीं सरकारी देखरेखीऐवजीं सरकारची तटस्थ वृत्ति आली. याप्रमाणें पूर्वींचा सर्व मनु बदलला व या परिस्थितीच्या बदलानें कारखानदार व मजूर यांचेमध्यें एक प्रकारचें औद्योगिक युद्ध सुरू झालें व पहिल्या प्रथम या युद्धांत कारखानदारांची बाजू स्वाभाविक जास्त बलवान् झाली. कारण आधीं संपत्तीच्या उत्पत्तीचें मुख्य साधन भांडवल व यंत्रसामग्री तीं त्यांचे हातीं आलीं. शिवाय कारखानदारांचा वर्ग स्वाभाविकच लहान असल्यामुळें त्यांचा एकोपा व एकमत चटकर होई. यामुळें मजुरांना मजुरी ठरविण्याच्या चढाओढींत मजुरांचा पक्ष दुर्बळ होई. कारखानदार व मजूर यांच्या सहकारितेखेरीज संपत्ति उत्पन्न होणें शक्य नव्हतें हें खरें; तरी पण ही सहकारिता राक्षस व वामनमूर्ति यांच्या सहकारितेसारखी होती. ज्याप्रमाणें यांमध्यें शेवटीं वामनमूर्तीलाच दुःखें व हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, तोच प्रकार मजुरांचा झाला व म्हणूनच सरकारला कारखान्यांचे कायदे करावे लागले; यांचें मागल्या भागांत स्पष्टीकरण केलेंच आहे. या भागांत मजुरांनीं स्वावलंबनानें स्वीकारलेल्या उपायांचा विचार करावयाचा आहे. त्यांतला पहिला उपाय म्हणजे संपाचा होय. ज्याप्रमाणें मनुष्य मोठया संकटांत असलें म्हणजे त्याची विचारशक्ति व दूरदृष्टि याचा त्याला विसर पडतो व तो प्रथमतः तात्कालिक उपायांची योजना करतो, तोच प्रकार मजुरांचा झाला. त्यांना सुचलेल्या उपायांपैकीं सर्वांत कमी उपयोगाचा उपाय म्हणजे संपाचा होय. त्याच्या वरची पायरी मजूरसंघाला दिली पाहिजे व सर्वांत उच्च पायरी परस्पर साहाय्यकारी तत्वाला दिली पाहिजे. येथ या उपायांचा व या त्यांच्या चढत्या उपयुक्ततेचा क्रमानेंच विचार करावयाचा आहे.