पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२११] कारखान्याची पद्धति इंग्लंडांत प्रथमतः सुरू झाली. यामुळें त्याचे दुष्परिणाम तेथेंच प्रथमत: दृष्टोत्पत्तीस येऊं लागले व ते निवारण्याचे कायद्याचे उपाय इंग्लंडांतच पहिल्या प्रथम अंमलांत आले व त्यांचें अनुकरण दुसऱ्या देशांनीं केलें. या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या बाबतींत मात्र फ्रान्स व जर्मनी यांनीं आघाडी मारली. देशांतील उद्योगधंद्यांची वृद्धि होण्यास व एकंदर बहुजनसमाजाची स्थिति सुधारण्यास शिक्षण - प्राथमिक व औद्योगिक - हें अत्यंत अवश्य आहे हें तत्व या सरकारनें प्रथम स्वीकारलें व इंग्लंडमध्यें त्याचें अनुकरण झालें. शिक्षणाच्या प्रसारामुळें मजूरवर्गामध्यें आपल्या स्थितीची जाणीव जास्त स्पष्टपणें उत्पन्न झाली व त्याच्यायोगानेंच स्वावलंबनाचे मार्ग मजूरवर्ग स्वीकारूं लागला. आतां या स्वावलंबनाच्या निरनिराळ्या मार्गांचा विचार पुढील तीन चार भागांत करावयाचा आहे.

                               भाग बारावा.
                        संप व त्याचे सांपत्तिक परिणाम.

प्राणिशास्त्रांत असें एक तत्व सांगण्यांत येतें कीं. प्राण्याला नवीन काम करण्याचें भाग पडलें म्हणजे त्या काळाला अनुरुप अशा इंद्रियाचा प्रादुर्भाव त्या प्राण्याच्या शरीरांत होऊं लागतो; परंतु हेंच तत्व समाजशास्त्रांतही दिसून येतें व या भागांतील संप व पुढल्या भागांत विचार करावयाचे मजूरसंघ व या समाजांतील संस्था अशाच उदयास आलेल्या आहेत. घरगुती धंद्याच्या काळांत या संस्थांना अवसरच नव्हता. त्या काळीं प्रत्येक कामगार हा स्वतंत्र धंदेवाला असे. तो आपल्या घरगुती धंद्यामध्यें दोन चार उमेदवार घेई व ते उमेदवार आपल्या कामांत चांगले निष्णात झाले म्हणजे स्वतंत्र धंदा करूं लागत. धंद्याच्या या अवस्थेंत कारखानदार व मजूर अशा समाजांतील लोकांचें वर्गीकरण झलेलें नसतें. प्रत्येक मनुष्य हा छोटेखानी कारखानदारच असतो, शिवाय या