पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/217

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२०७]

रुपांतर होणें दुरापास्त होतें. शिवाय पैसेवाले व कारखाना काढण्यास लागणारे गुण असणारे लोक देशांत थोडे असल्यामुळें ते करतील ती पूर्वदिशा असा प्रकार झाला. या कारखान्यांना मजूर माणसें कोणतींही चालत. देशांतील कामगार लोकांना तर आतां धंदा नाहींसा झाला. यामुळें या लोकांची गर्दी गिरण्यांच्या व कारखान्यांच्या दारांत होऊं लागली व अशा परिस्थितींत कारखानदारांनीं मजुरांना होतां होईल तितकी मजुरी कमी द्यावी व आपला होतां होईल तितका फायदा करून घ्यावा, हें मानवी स्वभावास अनुसरूनच होतें. यामुळें मजुरीचे दर सरसकट एकवटत चालले व कारखानदारांचा नफा व भांडवलवाल्यांचे व्याज मात्र वाढत चाललें. ह्मणजे नफ्याचा किंवा व्याजाचा दर वाढला असें नाहीं, तर कारखान्याचा परीघ व व्याप वाढल्यामुळें जरी प्रत्येक देवघेवींत नफा किंवा व्याज कमी असलें तरी या देवघेवीचें प्रमाण व देवघेवीचा वारंवारपणा इतका वाढला कीं, भांडवलवाल्याचें व कारखानदाराचें उत्पन्न विलक्षण वाढलें व त्यामुळें त्यांची दरवर्षीं शिल्लक जास्त पडत चालली. मजुरांची स्थिति याचे उलट झाली. त्याचें उत्पन्न किंवा मजुरी त्यांना जेमतेम संसारास पुरेशी असल्यामुळें त्यांच्या स्थितींत फरक पडणें अशक्य झालें. यामुळें समाजामध्यें संपत्तीची विषमता अत्यंत तीव्र झाली. एकीकडे लक्ष्मीपति व दुसरीकडे भिक्षापति दिसूं लागले. श्रीमंत व गरीब यांमध्यें पूर्वीं जें कमी अंतर असे तें आतां जमीनअस्मानाचें अंतर पडलें. देशाच्या भरभराटीमुळें देशांतील लोकसंख्या वाढली; त्यामुळें धान्याच्या किंमती वाढत चालल्या व जरी मजुरांची मजुरी वाढली तरी त्यापासून त्यांचा ह्मणण्यासारखा फायदा झाला नाहीं. कारण वाढलेली मजुरी धान्याच्या वाढत्या किंमतींत मुरून गेली. यामुळें मजुरांची दिवसेंदिवस हलाकीची स्थिति होत चालली. याप्रमाणें घरगुती धंद्यांची पद्धति नामशेष हेऊन प्रचंड कारखान्यांची पद्धति सुरू झाल्यानें मानवी श्रमाची महती कमी झाली, इतकेंच नाहीं तर दुसरेही पुष्कळ परिणाम घडून आले व त्यांचेयोगानेंही मजूरवर्गावर अनिष्टच परिणाम झाला.
 प्रचंड कारखान्यांच्या पद्धतीबरोबर शहरांची झपाट्यानें वाढ होत चालली व खेड्यांतील वस्ती शहरांत येऊन भरूं लागली. अशा दाट वस्तीच्या शहरीं राहणें मजुरांस भाग पडूं लागल्यामुळें त्यांच्या आरोग्यावर