पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[९]

तल्या बहुतेक देशांत नाण्याचा सुकाळ झाला व पदार्थांच्या किंमती अतोनात वाढू लागल्या. ज्याप्रमाणें अलीकडील चारपांच वर्षांमध्यें हिंदुस्थानांत पदार्थाच्या बाजारभावांत विलक्षण क्रांति होत चालली आहे व यामुळे लहानथोर, अशिक्षितसुशिक्षित, गरीबश्रीमंत वगैरे सर्व वर्गाच्या लोकांचें लक्ष या विषयाकडे लागलें आहे, अशीच स्थिति त्या काळीं युरोपखंडांत झाली. दहावीस वर्षांत पदार्थांच्या भावांत जमीनअस्मानाचें अंतर पडू लागलें. या सर्व कारणांनीं विचारी लोकांचें लक्ष या संपत्तीच्या विषयाकडे लागलें व याचेंच फळ अर्थशास्त्राचा उदय हें होय.
 संपत्तीसंबंधाने युरोपियन लोकांच्या व राष्ट्रांच्या मनांत विचार येऊं लागून त्याला जें पहिलें व्यवस्थित स्वरूप आलें त्यालाच अर्थशास्त्राचे इतिहासकार अर्थशास्त्रातील पहिला पंथ म्हणतात. या पंथाचें नांव उदीमपंथ होय. या पंथाचीं दोन भिन्न भिन्न वर्णनें सांपडतात. या पंथाच्या प्रवर्तकांनी किंवा त्याच्या अनुयायांनीं या पंथाचीं तत्वे व मतें यांचा सविस्तरपणें विचार करून लिहिलेले ग्रंथ पुष्कळ काळपर्यंत उपलब्ध नव्हते. बराच काळपावेतों या पंथाच्या तत्वाची जी माहिती लोकांना होती ती या पंथाचा विरोधक अॅडम स्मिथ याच्या ग्रंथावरूनच काय ती होती. अॅडम स्मिथनें या पंथाचें खालीलप्रमाणें वर्णन केलें आहे.
 या पंथाच्या मताप्रमाणें संपत्ती म्हणजे सोनें, नाणें किंवा पैसा होय. अर्थात् संपत्ति व पैसा हे समानार्थक शब्द इतकेंच नव्हे तर संपत्तीचें सारसर्वस्व म्हणजे पैसा. ज्याप्रमाणें एखाद्या व्यक्तीजवळ हजारों रुपये असले म्हणजे आपण त्याला श्रीमंत म्हणतों, त्याप्रमाणेच ज्या देशांत पैसा व सोनेंरुपें मुबलक आहे तो देश श्रीमंत होय. म्हणूनच ज्या देशाला आपली भरभराट व्हावी अशी इच्छा असेल त्यानें देशांत पैसा जास्त येण्याचें धोरण ठेविलें पाहिजे. ज्या देशांत सोन्यारुप्याच्या खाणी आहेत,तेथें विशेष तजवीज करण्याची गरज नाहीं, परंतु जेथें अशी स्थिति नाहीं, तेथें बाहेरून देशांत सोनेरुपें येईल व देशांतील सोनेंरूपें बाहेर न जाईल अशी तजवीज केली पाहिजे व म्हणूनच या पंथाच्या पुरस्कर्त्यांनी प्रथमतः सोन्यारुप्याचा निर्गत व्यापार कायद्यानें बंद केला. परंतु असले कायदे सहज मोडतां येतात असें दिसून आल्यावरून या प्रत्यक्ष प्रतिबंधा-