पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/189

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१७९]

म्हणतां येईल. या पद्धतीमध्यें गुलाम हे प्रत्यक्ष जमीन कसतात, गुलामांचे मालक गुलामांना खावयाला घालतात, व हा खर्च जाऊन जी शिल्लक राहील तें या पद्धतींत सर्व मालकाचें उत्पन्न समजलें जातें; त्यांत कोणीही वांटेकरी नसतो. गुलाम मालकांच्या सत्तेचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या श्रमाबद्दल मजुरी यावी लागत नाहीं. परंतु ही पद्धत अर्थशास्त्रदृष्ट्या फारच कनिष्ठ दर्जाची आहे. कारण गुलामांना शेतकीची लागवड चांगली हुरूपानें करण्याची बुद्धि होणें शक्य नसतें. कारण शेतीचें उत्पन्न वाढलें तरी त्यांचें त्यापासून हित मुळींच नसतें. गुलाम हे स्वाभाविक कामचुकार असतात. धन्याच्या चाबकाच्या भीतीनेंच फक्त ते काम करतात. यामुळे अशा जुलुमाचें काम अगदीं कनिष्ठ दर्ज्यांचे असतें हे सांगण्याची जरुरी नाहीं. या पद्धतीपासून शेतीचें उत्पन्न फार कमी येतें, इतकेंच नव्हे तर शेताची मशागत व निगा नीट न राहिल्यामुळे लागवडीची जमीन दिवसेंदिवस कमकस होत जाऊन शेवटीं ती जमीन अगदी नापीक होते. अमेरिकेमध्यें गुलामांच्या श्रमानें जी शेतकीची लागवड होत असे, त्यामध्येंही असाच अनुभव आलेला आहे. ग्रीक व रोमन लोकांमध्यें गुलामांची स्थिति अमेरिकेंतील गुलामांइतकी वाईट नव्हती. त्यांना घरांतल्या चाकरमाणसांप्रमाणें वागविलें जात असे. ग्रीक गुलाम व मालक यांच्यामध्यें तीव्र वर्णभेदही नव्हता यामुळे गुलामांबद्दल अमेरिकेमध्यें दिसून येणारी तुच्छताबुद्धी नव्हती, शिवाय ग्रीक गुलामांना मालकाच्या परवानगीनें आपली दास्यांतून मुक्तता करून घेतां येत असे; यामुळे धन्याला खुष करून पुढेंमागे आपली सुटका करून घेतां येईल अशी आशा ग्रीक गुलामांना असे. म्हणून ग्रीक व रोमन लोकांच्या काळीं दासष्ट्षीचे अमेरिकन दासकृषीइतके वाईट परिणाम दिसले नाहीं इतकेंच. परंतु दासकृषी ही सर्वात कनिष्ठ दर्ज्याची कृषिपद्धति होय ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे.या पद्धतीमध्यें शेतीची जमीन फार झपाट्यानें निकस होत जाते व या शेतलागवडीच्या पद्धतीनें धनोत्पादनही फारच कमी प्रमाणावर होतें. या कारणानें ही पद्धति अर्थशास्त्रदृष्ट्या अगदीं त्याज्य ठरते. शिवाय मानवी जातीबद्दल आदरभाव उत्पन्न झाल्यापासून गुलामगिरी अमानुष वाटू लागला; यामुळे ही पद्धत नीतिदृष्ट्याही गर्हणीय वाटू लागली व म्हणून क्रिश्चन धर्माच्या प्रसाराने युरोपांतील गुलाम