पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१५३]

या क्रमाला बाधक अशीं कारणें उद्भवूं शकतात व अशीं बाधक कारणें अस्तित्वांत असतां खंडाचा क्रम उलटही होऊं शकतो.
 रिकार्डोच्या या उपपत्तीला अनुकूळ व प्रतिकूळ असें इतकें वाङ्मय इंग्रजी भाषेंत आहे कीं, त्या सर्वांचा सविस्तर विचार करण्यास आपल्याजवळ पुरेशी जागा नाहीं. परंतु वर दिलेल्या अल्प विवेचनावरून या उपपत्तींतील ग्राह्यांश व त्याज्यांश वाचकांच्या ध्यानांत येईल, असें वाटतें.
 समाजांतील संपत्तीचे निरनिराळ्या वर्गामध्यें जे हिस्से पडतात त्यांपैकीं जमिनीचा खंड हा एक आहे. सुधारलेल्या देशांत इतर हिश्शाप्रमाणें हा हिस्साही चढाओढीनें ठरला जातो व जरी पूर्वकाळीं हा पुष्कळ ठिकाणीं रुढीनें ठरून गेलेला असला व अजूनही पुष्कळ ठिकाणीं तो रुढीनेंच ठरतो, तरी पण रुढीच्याऐवजी चढाओढ येण्याचा जिकडे तिकडे कल दिसून येतो. हा खंड चढाओढीनें ठरण्याचा परिणाम असा होतो कीं, खंडानें जमीन करणारा शेतकरी सुपीक जमीन कसो कीं कमी मगदुराची जमीन कसो, त्याला दोन्हीं लागवडींपासून सारखाच फायदा मिळतो; व या दोनही लागवडींतील अंतर खंडाच्या रूपानें जमीनदारास जातें. हेंच रिकार्डोच्या उपपत्तींतील मूळ बीज आहे; व दुसरें हें कीं, बाधक कारणें अस्तित्वांत आलीं नाहीत तर हा खंड सारखा वाढत जातो. कारण देशामध्यें लोकवस्ती वाढून एकंदंर सर्व जमीन लागवडीस आल्यावर उतरत्या पैदाशीचा नियम लागू होतो व असा नियम लागू झाला म्हणजे मग धान्यांचे भाव वाढतच ज्राण्याच्या कल उत्पन्न होतो व त्याबरोबरच खंडही वाढत जातो. इतका रिकार्डोच्या उपपत्तींतील भाग त्रिकालाबाधित राहतो यांत शंका नाहीं. बाकी लागवडीचा दिलेला क्रम, खंड हा प्रकार मुळीं जमिनीच्या कमी अधिक मगदुरानें उत्पन्न होतो व देशांमध्यें बिनखंडी लागवडीची जमीन असते वगैरे या उपपत्तीतील भाग त्याज्य आहेत असें म्हणणें प्राप्त आहे.