पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[४]


म्हणूनच हें वाङ्मय संस्कृतांत अपरंपार आहे. परंतु धार्मिक आचार योग्य त-हेनें पाळण्याकरितां आमच्या धर्मात मुहूर्त, विशेषकाळ व ऋतू सांगितलेले असल्यामुळे ही कालगणना करण्याकरितां ब्राह्मणांना ज्योतिषशाखाची उपपत्ति करावी लागली; व गणित, बीजगणित, त्रिकोणमिति वगैरेंसारख्या गणितशास्त्राची अवश्यकता, ग्रह व तारे यांच्या गतीचें ज्ञान होण्यास अवश्य असल्यामुळे, हेंही शास्त्र ब्राह्मणांनीं वाढविलें. गांवचे उपाध्याय, गांवचे जोशी, गांवचे धर्मोपदेशक व गांवचे शिक्षक या नात्यानें ब्राह्मणांना गांवांत व समाजांत साहजिक प्रमुखत्व होतें; व जुन्या काळीं वैद्यक व फलज्योतिष यांचा पुष्कळ संबंध असल्यामुळे ब्राह्मणांकडे वैद्यकीचा धंदाही ओघानेंच आला. म्हणूनच वैद्यकशास्त्र व त्याला उपयोगी असे वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, शारीरशास्त्र व रोगचिकित्साशास्त्र यांच्याही थोडाबहुत व्यासंग ब्राह्मणांस करणें भाग पडले व यामुळेच या आधिभौतिक शास्त्राचं थोडेबहुत वाङ्मय आमच्यामध्ये सापडते.
 परंतु ब्राह्मणांनीं पूर्वकाळीं वाणिज्यवृत्ति कधींच पत्करलेली दिसत नाहीं. यामुळे उद्योगधंदे, कलाकौशल्य व व्यापारउदीम यांची शाखीय उपपत्ति करून त्यांचें एक स्वतंत्र शास्त्र बनविण्याची कल्पना साहजिकपणें त्यांच्या डोक्यांत आली नाहीं. आपल्या समाजांत कलाकौशल्याची, उद्योगधंद्याची व व्यापारउदीमाची वाढ व प्रगति वैश्यवर्गानें पुष्कळ केली. ही वाढ व प्रगति युरोप ज्या वेळीं अगदीं रानटी स्थितीत होतें त्या वेळेपासून झालेली होती हेंही खरें. आमच्या वैश्यवर्गानें हस्तकौशल्य, प्रत्यक्ष अनुभव व कामाचा 'बापापासून लेकाला' अशा सांप्रदायस्वरूपानें मिळे. यामुळे तें ज्ञान पुस्तकांत ग्रथित करून त्यावरून सामान्य तत्वें व सिद्धान्त काढणें व त्याची उपपत्ति बसविणें हें काम वैश्यवर्णाला शक्य नव्हतें. कारण, विद्या व ज्ञान याला ते अगदीं पारखे असल्यामुळे, असल्या तऱ्हेचा बुद्धिविकास त्यांच्यामध्यें झालेला नव्हता. यामुळे जरी आमच्या इकडे औद्योगिक प्रगति झाली व तत्संबंधीं संस्थाही पूर्णत्वास आल्या तरी त्यांची उपपत्ति व मीमांसा करणारें शास्त्र निर्माण झालें नाहीं. याचें एक उदाहरण अर्थशास्त्रातील एका विषयाचें घेता येईल. अर्थशाखांतील एक महत्वाचा व मनोरंजक भाग म्हणजे पैसा व विनिमय हा होय. या भागांत पैशाचें