पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३२]

धंद्याच्या वाढीकडे अलीकडे लागलें आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे, हिंदुस्थानचा अमेरिकेप्रमाणें अत्यंत मोठा धंदा शेतकी असल्यामुळें शेतकीच्या शिक्षणाची सोय या गेल्या सातआठ वर्षांत विशेष तऱ्हेने होऊं लागली आहे. पुसा येथें एक सर्व हिंदुस्थानाकरितां प्रयोगशाळा व फार मोठें कॉलेज सरकारनें काढलें आहे. त्याचे खालोखाल पुण्याचें शेतकी कॉलेज होत आहे. तसेंच पुष्कळ ठिकाणीं लहान लहान प्रयोगक्षेत्रें निर्माण झालीं आहेत, त्यांमध्यें हिंदुस्थानांतील गहूं, कापुस, तंबाखू, चहा वगैरे विशेष प्रकारच्या मालाची सुधारणा करण्याचे प्रयोग चालू आहेत. तसेंच शेतक-यांमध्यें शेतकीचें हें नवें ज्ञान त्यांच्याच भाषेंत त्यांना देण्याची तजवीजही सरकार करीत आहे. याला लोकनायकांचीही सहकारिता पाहिजे व अशी सहकारिता ठिकठिकाणीं मिळतही आहे. इतर धंद्यांच्याही औद्योगिक शिक्षणाची सोय थोडीबहुत होऊं लागली आहे. या बाबतींत कै० टाटाशेटजींची शोधशाळाही एक हिंदुस्थानांत अपूर्व संस्था निर्माण होत आहे यांत शंका नाहीं, व ही संस्था उत्तम तऱ्हेनें चालून त्यांतून शिकलेले पदवीधर बाहेर पडूं लागले म्हणजे त्यांचा देशांतील उद्योगधंद्यांवर सुपरिणाम झाल्याखेरीज राहणार नाहीं. याप्रमाणें हिंदुस्थानांत आतां या प्रश्नाबद्दल थोडीशी जागृति झाली आहे ही शुभसूचक गोष्ट आहे. इतर सुधारलेल्या देशांच्या मानानें हिंदुस्थान अगदीच मागें आहे हें मात्र विसरतां कामा नये.
 परंतु या सर्व शिक्षणाचा देशांत प्रसार होण्यास प्राथमिक शिक्षण सक्तीचें व मोफत केलें पाहिजे हें निर्विवाद आहे. सरकार परकी असल्यामुळें लोकांवर सक्ति त्यांना भय वाटतें. तेव्हां या बाबतींत लोकनायकांनीं पुढाकार घेऊन सरकारचे हात दृढ केले पाहिजेत व हा लोकशिक्षणाचा प्रश्न सरकारच्या डोळ्यापुढें वारंवार आणून शिक्षणाचा प्रसार हल्लीं मंदगतीनें चालला आहे त्यापेक्षां पुष्कळ वेगानें होईल अशा तऱ्हेची खटपट करणें व सरकारकडून हें करवून घेणें हें सुशिक्षितांचें काम आहे.