पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२४]

त्यांच्या सामान्य हितकारक परिणामापलीकडे येथें जास्त विचार करण्याची जरूरी नाहीं, या संस्थांचें स्वरूप व त्यापासून बहुजनसमाजावर होणारा सांपत्तिक परिणाम यांचें सविस्तरं विवेचन पुढें होईलच. परंतु अशा संस्थांपैकीं अलीकडे सर्व सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें अगदी सार्वांत्रिक झालेली संस्था म्हणजे पोस्टल सेव्हिंग बँक ही होय. हल्लींच्या काळीं ज्या ज्या ठिकाणीं पोस्टाचें ऑफिस असेल त्या त्या ठिकाणी गरीब लोकांच्या शिलकांची ठेव देण्याची सेहिंग बँकेची शाखा असतेच असते. या बँकेंत ८४ आण्यापासून सुद्धां रकमा ठेवीदाखल घेतल्या जातात व अशा बँका पोस्टांत असल्यामुळें खेडेगांवांतील लोकांससुद्धां त्याचा उपयोग करून घेतां येतो. या ठेवीवर लोकांना थोडेंबहुत व्याज मिळतें. ज्याप्रमाणें सहकारी पतीचें तत्व किंवा परस्पर साहाय्यकारित्वाचें तत्व या तत्वांनीं अलीकडे सामाजिक क्रांति घडवून आणली आहे त्याचप्रमाणें ही पोस्टल बँकांची कल्पना हा एक सामाजिक शोधच असून त्यानें जगांत मोठी क्रांति घडवून आणली आहे. गरीब लोकांची स्थिति सुधारण्यास त्यांच्यामध्यें दूरदर्शीपणा व काटकसर हे गुण वाढविण्यास व अतएव देशांत भांडवल वाढवून देशाचा व व्यक्तीचा असा दुहेरी फायदा करण्यास ही संस्था एक उत्तम साधन झालेलें आहे. वर सांगितलेंच आहे कीं, या संस्थांमध्यें अगदीं लहान लहान रकमाही ठेवी म्हणून घेतल्या जातात व असे पैसे मनुष्याच्या हातांत नसल्यामुळे खर्च होण्याचा संभव कमी असतो. आपल्याच घरांत पैसे आपल्या पेटींंत ठेवणें किंवा पुरून ठेवणें व पैसे बँकेंत ठेवणें यांमध्यें जो मोठा फरक आहे ते या गोष्टीमध्यें आहे. घरांत ठेवलेला पैसा आपल्या हातींच असतो व बँकेंतील पैसा दुस-याच्या हातांत असतो. दुसराही एक महत्वाचा फरक या दोन शिल्लक टाकण्याच्या पद्धतींत आहे; तो हा कीं, पहिल्या पद्धतींत आपल्या शिलकेपासून कांहीं एक उत्पन्न होत नाहीं, परंतु दुस-या पद्धतींत ठेव ठेवणाराला आपल्या शिलकेवर व्याजाच्या रूपानें वार्षिक उत्पन्न येऊं लागतें. या संस्थांनीं जगांत किती नवें भांडवल उत्पन्न केलें आहे हें दर वर्षीं प्रसिद्ध होणा-या स्टेट्समन व इतर बुकांमधील पोस्टल बँकेतील दर देशाच्या ठेवीच्या आंकड्यांवरून सहज दिसून येईल.
 हिंदूस्थानांत संपत्तीची वाढ होत चालली आहे किंवा नाहीं हा मोठा वादग्रस्त प्रश्न आहे व ज्यापेक्षां त्या प्रश्नाचा विचार सविस्तरपणें या ग्रंथाच्या