पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/112

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१००]

म्हणजे त्यामध्यें मोठी शक्ति उंत्पन्न होते; त्याप्रमाणेंच जी संपत्ति व पैसा देशांतील व्यत्कींजवळ अल्पप्रमाणानें असतांना त्यांत शत्कि नसते, तोच संयुक्त भांडवलाच्या तत्वानें एकत्र झाल्यानें त्याचें अवाढव्य भांडवल तयार होतें व मग विराटस्वरूपी कारखाने देशांत निर्माण होऊं शकतात. या फायद्यामुळे हें तत्व जगांत इतकें पसरलें आहे.
 हिंदुस्थानची या तत्वासंबंधींची सध्यांची स्थिति इंग्लंडांतल्या अॅडम स्मिथच्या काळच्या सारखी आहे. हें तत्व अजून येथें बाल्यावस्थेतच आहे म्हणावयाचें. कारण संयुक भांडवलाचे पुष्कळ कारखाने आपले इकडे बुडालेले आहेत किंवा किफायतशीर झालेले नाहींत. हिंदुस्थानांत ज्या जाती पिढीजाद व्यापारीपेशाच्या आहेत त्यांनीं हें तत्व आपलेंसें करून तें फायदेशीरही करून दाखविलें आहें. पार्शी, भाटे, गुजराथी व मारवाडी या लोकांचे संयुक्त भांडवलाचे कारखाने चांगल्या तऱ्हेंनें चालतात; परंतु ब्राम्हण व इतर जातींनीं काढलेले संयुक्त भांडवलाचे कारखाने चांगले चालत नाहींत, याला दोन कारणें आहेत. पहिलें कारण या जातींमध्यें अजून व्यापाराचा आत्मा जी सचोटी तो पूर्ण मुरला नाहीं. यामुळे संयुक्त भांडवलाच्या कंपन्यांचे मॅनेजर व व्यवस्थापक हेच स्वतः पैशाची अफरातफर करतात व कंपनीच्या कारभारास धोका आणतात; केव्हां केव्हां धंद्याचें व कारभाराचें ज्ञान बरोबर नसल्यामुळेही नुकसान होतें. दुसरें कारण आपल्या लोकांमधील सामाजिक कर्तव्याची अंधुक कल्पना होय. संयुक्त भांडवलाच्या कंपन्या डायरेक्टर मंडळीच्या देखरेखीखालीं चालतात; परंतु डायरेक्टर लोकांना आपल्या कर्तव्यांची म्हणण्यासारखी जाणीव नसते व यामुळे भागीदारांच्या होणाऱ्या नुकसानाकडे त्यांचा कानाडोळा होतेी किंवा डायरेक्टर लोक कंपनीच्या कारभारापासून आपला खासगी फायदा करून घेण्याचा स्वार्थी विचार करतात. परंतु योग्य विचार केल्यास असें दिसून येईल कीं, कंपनीचा कारभार चोखरीतीनें व दक्षतेनें चालविल्यास त्यांत स्वार्थ व परमार्थ हे दोन्हीही साधतात. कारण डायरेक्टर लोकांचे बऱ्याच किंमतीचे भाग कंपनींत असतातच. तेव्हां कंपनी यशस्वी झाली तर त्यांत सर्व भागीदारांप्रमाणें त्यांचा स्वतःचाही फायदा होतो. शिवाय संयुक्तभांडवलाचे कारखाने व धंदे यशस्वी होत गेले म्हणजे तितक्याच भागीदारांचा फायदा होतो असें नाहीं,