पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोलिस ठाण्यात आणून ठेवला होता. त्यामुळे हैदराबाद रेडिओ सांगेल तेच ऐकायचे. एरवी तरी दुसरे काय ऐकता येणार होते! कारण रेडिओवरील स्टेशने माहीत कुणाला होती? अमीन मात्र शहाणा माणूस होता. परिस्थितीची थोडीफार कल्पना त्याला होती. पण तो सत्य न सांगता हैदराबादचा प्रचारच समजावून सांगे. त्याने भारताचा नकाशा गावकऱ्यांसमोर टांगून ठेवला आणि दोन बाजूने पाकिस्तान व खालून हैदराबाद ह्यामुळे हिंदुस्थानच कसा घेरला गेला आहे हा मुद्दा गावकऱ्यांच्या मनावर ठसविण्याचा त्याने प्रयत्न केला. गावकऱ्यांना हे म्हणणे मुळीच आवडत नव्हते, पटत नव्हते. पण शेवटी त्याला उत्तर काय ? हिंदुस्थानच घेरला गेलेला आहे हे सत्य टाळणार कसे ? त्यातल्या त्यात शहाणा असा एक हिंदू शिक्षक गावात होता. त्याने एक दोन नकाशे काळजीपूर्वक तपासले. काँग्रेसच्या एका पत्रकात भारताचा नकाशा व त्यात हैदराबाद होते. मोठ्या दुःखाने गुरुजींनी लोकांना सांगितले, "बाबांनो, गोष्ट खरी आहे. आपणाला मुसलमानांनी घेरलेले आहे. गावाच्या वाटांवर चौक्या बसवून गाव घेरले तसे भारत घेरलेले आहे." लोक जास्त हताश होऊ लागले.

 अमीन अब्दुल अजीज निरनिराळ्या बाबी सांगत असे. तो म्हणे मुंबई आणि मद्रासला जाणाऱ्या सर्व रेल्वे हैदराबादमधून जातात. त्या बंद केल्या की मद्रास दिल्ली पासून तुटले. मनमाडपर्यंत निजामी रेल्वे होतीच. मनमाड जिंकले की दिल्ली आणि मुंबईची ताटातूट. नकाशात ठिकाणे अधिकच जवळजवळ दिसत. मग तर फारच वाईट वाटे. एक आंतरराष्ट्रीय चोर सिडने कॉटन सतत चोरून शस्त्रे आणून हैदराबादला पुरवितो हे गावकऱ्यांना माहीत होते. ही चोरटी शस्त्रे विमानातून येत. हे विमान अडवणे अगर पाडणे भारताला शक्य नसल्यामुळे हैदराबादजवळ हत्यारे कशी गोळा होत आहेत ह्याबाबत भडक वर्णने गावकऱ्यांना अमीनने सांगितली होती. हैदराबाद संस्थानात एकूण वीस लक्ष मुसलमान (खरा आकडा सोळा लक्ष) त्यात दहा लक्ष स्त्रिया. अगदी म्हातारे व मुले सोडली तर पाच लक्षाची मुसलमान फौज हैदराबादेत तयार होऊ शकते. शस्त्रे सिडने कॉटनची. शिवाय आदिवासी, अस्पृश्य ह्यांच्या फौजा आणि ज्या हिंदूना जगण्याची इच्छा आहे त्यांच्या फौजा, अशा संभाव्य फौजांची संख्या सहजच दहा लक्ष होणार. शिवाय निजामाची सून निलोफर बेगम इराणची म्हणून मदतीला येणाऱ्या इराणी, अफगाणी फौजा, पाकिस्तानच्या फौजा आणि भारतातील कोट्यवधी मुसलमान. मग भारताचे काय होणार? गावकऱ्यांना चिंतेचा हाही एक

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७८