पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/135

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२२
पौराणिक काल.

 हा काल म्हणजे, अलीकडील २००० वर्षांचे पलीकडचा होय. ह्याच कालामध्यें आर्य लोकांची सर्व प्रकारे प्रगति होऊन त्यांचा विस्तार व राज्यस्थापना झाल्या. दक्षिणेत आर्य लोकांचा प्रवेशही ह्याच कालचा होय. मोठमोठालीं शहरे वसली गेली, पुष्कळ जमीन लागवडीस आली, व दूरदूरच्या प्रांतीं दळणवळण वाढले ह्या कारणांनी पुष्कळच रानांचा नाश झाला असावा. तथापि, रानेंवनें काही कमी नव्हतीं. रामायणामध्यें पुष्कळ वनांचा जागोजाग उल्लेख आहे. राजधान्यांपासून एकेक दिवसाचे मजलेवर राने असल्याची वर्णने आहेत, व राजे लोकांनीं मृगयेकरितां राने राखून ठेवण्याची पद्धत होती असे दिसते. बहुतेक दक्षिणदेश दण्डकारण्याने व्याप्त होता. तथापि, आर्य लोकांच्या सहवासाने मूळच्या अनार्य लोकांमध्येसुद्धा सुधारणा होऊन त्यांची राज्ये स्थापन झाली होती॰ उत्तर हिंदुस्तानांमध्ये निषादांचा राजा गुह होता असे वर्णन आहे. व दक्षिणेससुद्धां रावण, वाली, सुग्रीवादिकांची राज्ये होती. परंतु रानांची व्याप्ति किती होती हे सांगण्यास मार्ग नाहीं. भारतकाली सुधारणा जास्त झाली व राज्येही वाढली त्यामुळे वनांचा नाश जास्तच झाला असावा. दण्डकारण्यामध्येसुद्धां विराटाचे राज्य झाले होते. तथापि, शिल्लक राहिलेल्या रानांचा विस्तार कांहीं कमी नसावा. तो अमुकच असावा असे सांगण्यास मात्र आधार नाहीं.