पान:स्वरांत.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलंन्. दाताखाली पान रगडलं असेल नसेल तोच अश्विनीकुमार दत्त म्हणून उभे!
 अश्विनीकुमार... त्यांच्या नाकाला सोमरसाचा घमघमाट सोसवेनासा झालेला. तोंडाला पाणी सुटलेलं.
 घोषा सावध. ओठ गच्च मिटून.
 'देवी, सोमरसासाठी धावत आलोय. ती सोमवल्ली आम्हाला देशील?'
 '...............'
 'देवांचे वैद्य अश्विनीकुमार म्हणतात आम्हाला. त्या सोमरसाच्या केवळ 'गंधानं रक्त उत्तेजित झालं आमचे. देवी, ती पानं. तो रस...'
 'पानं मिळतील पण...'
 'काय पाहिजे ते माग.'
 'सुंदर रूप हवंय मला... सुंदर रूप इंद्राणीहून सरस असं...'
 मग पुन्हा घोषा...
 विवाहाच्या वेदीभोवती फेरे घालणारी. आनंदनिर्भरा.

* * *

 साडे - सहा वाजून गेलेले. ऑफिस भणाण रिकामं. फक्त बॉस थांबलाय. टाईप केलेले कागद हातात घेताना त्याची नजर बोचते.
 'उशीर झाला आज ?'
 'हं.'
 'थेट घरीच का आता ?
 'होय.'

१२/स्वरांत