Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. आणि आपणांत उत्पन्न झालेले प्रेम हेंच गुलाबाचें फूल होय. मीं जितक्या उत्सुकतेनें तें तोडलें; तितक्याच उत्सुकतेनें तें मालतीने घेतले; पण कांटा बोचला आणि त्यामुळे सगळी घाण झाली. हा कांटा कोण बरें असावा ? हां! ही लक्ष्मी ! मी आणि मालती या दोघांचींहि प्रेममय अंतःकरणें ही लक्ष्मी कांट्याच्या रूपानें विद्ध करणार असे दिसते. या असल्या काव्यमय विचारामुळे दिनकर नभोमंडळांत अधिकाधिक उंच चालला होता. परंतु इतक्यांत त्याचा विवेक जागृत झाला आणि त्यामुळे त्याचा सगळा मनोदुर्ग ढांसळला. प्रत्यक्ष स्थिति त्याच्या डोळ्यापुढे उभी राहिली. आणि त्यामुळे मालतीसंबंधानें आपण भलतेच विचार मनांत आणले असे वाटून त्याला थोडा अनुताप झाला. आणखी दोन महिने निघून गेले. या दोन महिन्यांत मालतीचा आणि त्याचा परिचय अधिकच वाढला. सुटीच्या दिवशीं मदन, वसंत आणि मालती या तिघांना घरोबर घेऊन दिनकर शहराच्या बाहेर लांबवर हिंडावयाला जाऊ लागला आणि बाहेरच्या मोकळ्या हवेंत दिनकर आणि मालती या दोघांची मनेंहि अधिक स्वैरसंचार करूं लागली. हळूहळू वामनरावाच्या सर्व कुटुंबार्शी दिनकरचा दाट परिचय होऊं लागला आणि क्वचित प्रसंगी वामनरावांच्या घरचें भोजनाचें आमंत्रणहि दिनकराला स्वीकारावें लागे. प्रथम वामनराव या शिकवणीबद्दल दिनकरला दहा रुपये पगार देत असत; पण दिनकरची शिकवण्याची पद्धत वगैरे पाहून ते त्याला पंधरा रुपये देऊं लागले. वामन- रावांच्या या वागण्यांत कांहीं गुढार्थ होता की काय तें ईश्वरास माहीत; पण दिनकर मात्र त्यांच्या स्नेहमय वागण्याचा भलताच अर्थ मनांत आणून केव्हां केव्हां निष्कारण विकारवश होत असे. युनव्हरसिटीच्या परीक्षांना लवकरच आरंभ झाला. प्रथम दिवाकराची एफ्. ए. ची परीक्षा झाली. नंतर लवकरच दिनकरची एम. एची परीक्षा झाली. दिनकरचे स्नेहीहि परीक्षा देऊन लवकरच मोकळे झाले. अशा रीतीनें या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेनंतरची रजा मिळाल्यावर त्या सर्वानी आपापल्या गांवीं जाण्याचे ठरविलें. त्याप्रमाणें गांवीं जाण्याच्या उद्योगांत असतां दिनकर रोजच्याप्रमाणे सकाळी वामनरावांच्या घरीं दाखल झाला.