पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या मूर्तीच्या प्रतिबंधित प्रदक्षिणा मार्गाकडे मला घेऊन गेला व प्रदक्षिणेचा अपवाद सन्मान दिला. मलाच हा सन्मान का? अशी विचारणा केल्यावर त्याने दिलेले उत्तर मला आजही रोमांचित करत राहतं. तो म्हणाला, “हा बुद्ध तुम्ही आम्हाला दिलात." त्याच्या वाक्यात कृतज्ञता होती नि डोळ्यांत श्रद्धा! बौद्ध धर्माकडे थायलंडवासी कसे पाहतात हेही मी तिथे त्या देशात असताना अनुभवले आहे. कंबोडियाचे अंकोरवाट शहर म्हणजे दुसरा भारतच. तिथेही बौद्ध धर्म प्रसारानंतर हिंद धर्म मंदिरे अबाधित राहिली. तिथलं बायोन मंदिर म्हणजे वेरूळचे कैलास मंदिरच. फरक इतकाच की वेरूळचे शिल्प पहाड खोदून तयार केलेय तर बायोनचे कैलास मंदिर (शिवालय) दगडे रचून उभारले गेले आहे.

मध्य व पश्चिम आशिया

 ‘बौद्ध संस्कृति'च्या चौथ्या भागात मध्य आशियातील अफगाणिस्तान, चिनी तुर्कस्तानमधील बौद्ध धर्म विस्ताराचा ऊहापोह आहे. पैकी अफगाणिस्तानमध्ये बौद्ध धर्माचा झालेला विस्तार तिथे नंतर आलेल्या अरबांना पाहवला नाही. त्यांनी बौद्ध विहार आणि अग्निशाळा उद्ध्वस्त केल्या. धर्मयुद्धाच्या नावाखाली त्यांनी सांस्कृतिक जिहाद पुकारला. पण काव्यात्मक न्याय कसा असतो पहा. नंतर चंगेजखानने अफगाणिस्तानवर चढाई केली. त्याने महाल, मशिदी व राहती वस्ती उद्ध्वस्त केली. मंगोल बुद्ध तर म्हणतात की, धर्मरक्षक महान देवता महाकाल चंगेजखानच्या रूपाने आला आणि त्याने बौद्ध विहार उद्ध्वस्त करणा-या, हजारो मठ नष्ट करणाच्या, लाखो निर्दोष भिक्षूना उद्ध्वस्त अरबांचा बदला घेतला.' ‘सटवाईचा लेख' नावाचे भारत सासणेंचे नवे कोरे पुस्तक नुकतेच वाचनात आले. त्यात त्यांनी डॉ. राहुल सांकृत्यायन यांचे सन १९३७ मध्ये केलेले अफगाणिस्तानातील बौद्ध धर्माच्या वाताहतीचे वरील वर्णन बलख शहराच्या विध्वंसासंदर्भात केले आहे. ते वर्णन डॉ. राहुल सांकृत्यायनांच्या अफगाण टिप्पणीचे भाषांतर आहे. डॉ. सांकृत्यायन इतिहासही किती काव्यात्मक व ललित सौंदर्याने मांडतात त्याचा हा नमुना. मध्य आशियावर आक्रमण न करणारा आळशी. त्याची प्रचिती कुरव, सिकंदर, कनिष्क, हूण, मुहम्मद गझनी, चंगेजखान इत्यादी आक्रमकांच्या चढायांच्या तपशीलातून मिळते. आणि लक्षात येतं की जगातली अनेक छोटी-मोठी युद्धे राजकीय कमी, धार्मिक अधिक होती. धर्मप्रसार केवळ धर्म प्रसार नसतो. तो भाषा, लिपी, साहित्याचा संकरही असतो. त्यातून नवी संस्कृती उदयाला येते. बौद्ध धर्म

साहित्य आणि संस्कृती/१४०