पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रस्तावना.




 आर्यांच्या धर्माची इमारत ज्या महाग्रंथांवर मूळ रचली गेली ते ग्रंथ वेद हे होत. वेद ह्मटले ह्मणजे त्यांत संहिता, ब्राह्मणें व आरण्यकें इतक्यांचा समावेश होतो. इतक्यांचे संपूर्ण अध्ययन जोपर्यंत झाले नाही तोपर्यंत पूर्ण वेदाध्ययन झाले नाही व तोपर्यंत वेदांचे सर्व रहस्य कळले नाहीं असेंच समजलें पाहिजे. सर्व तत्त्वज्ञानाचें सारच अशी जी उपनिषदें तो आरण्यकांचाच एक भाग आहेत. ह्या वेदग्रंथांपैकीं ऋग्वेदाची जी संहिता आहे त्या ऋक्संहितेपैकीं अगदी थोडीं सूक्तें मात्र बी. ए. च्या परीक्षेला नेमिलेली असतात. ह्यावरून सर्व वेदांचें ज्ञान करून घेण्यास आणखी कितीतरी अध्ययनाची जरूरी आहे त्याची थोडीशी कल्पना करितां येईल.
 वेदांची भाषा संस्कृत आहे खरी परंतु ती अतिशयच प्राचीन आहे. वेदांचा काल सहा हजार वर्षांच्या आंतला आहे असे प्रतिपादन करणे शक्यच नाहीं हें विद्वद्वर्य रा. रा. टिळक ह्यांनी अगदी निर्विवाद सिद्ध केले आहे. "इतका प्राचीन ग्रंथ समजावयास कठिण असला ह्मणून नवल नाहीं; परंतु वस्तुतः त्याच्या कालाकडे पाहिले तर जितका कठिण असावा तितका तो कठिण नाहीं ही एक सुदैवाचीच गोष्ट समजली पाहिजे." "या ऋक्संहितेत ब्रह्मज्ञानाविषयींचे भाग थोडे आहेत. बहुतकरून सर्व भाग प्रार्थनाबद्धच आहेत." "वेदाच्या काळी संस्कृत भाषा बऱ्याच पक्व दशेला आली होती. कारण ज्या भाषेत कविता होतात आणि त्या तरी एक दोन वृत्तांनीच रचिलेल्या नव्हेत, अनेक निरनिराळ्या प्रकारच्या वृत्तांनीं रचिल्या जातात, ती भाषा पक्व दशेला आलेली आहे असे समजावें. हा सिद्धांत वेदास लाविला तर वेदाच्या काळी संस्कृत भाषा उंच दशेला आली होती असें उघड होतें. सर्व