पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते प्रेरक बदल समाजात घडणे जसे आवश्यक आहेत तसेच ते पुरुष आणि स्त्रियांतही आपापल्या पातळीवर घडणे गरजेचे आहे. गेल्या शतकात साजऱ्या केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षांतील उपक्रमात पुरुषी मानसिकतेवर आघात केले जात. स्त्रीस्वातंत्र्याबाबत कधी-कधी टोकाची भूमिका घेतली जायची (जग नुसतं स्त्रियांचं हवं असा त्याचा आशय असायचा.) पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर आज आपण स्त्री-पुरुष समानतेकडून स्त्रीस 'माणूस' समजण्यापर्यंत, तिला तसं वागवणं, तिची तशी घडण व्हावी या विचारापर्यंत येऊन पोहोचलो आहोत.
 हे घडणं कसं शक्य आहे याचा मी जेव्हा विचार करू लागतो तेव्हा माझ्या मनात छोटे-छोटे प्रेरक बदल करण्याच्या शक्यता डोकावू लागतात. आपणाला शहाजहानसारखा भव्य ताजमहाल नाही बनवता येणार; पण आपल्या कल्पना, क्षमतेचा छोटा ताजमहाल (मनातील मुमताजसाठी...) बनवणं शक्य आहे. नुकतेच निधन झालेल्या हिंदी कथाकार, संपादक डॉ. राजेंद्र यादव यांची एक सुंदर कथा आहे. 'छोटे छोटे ताजमहल'. टीकात्मक कथा ती. आपणास अंतर्मुख करते. तसंच अलिकडे काही अपंग स्त्रिया ताजमहाल पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तिथल्या सुरक्षारक्षकांनी अटकाव केला होता. मी स्वत: ताजमहाल पाहण्यासाठी गेलो होतो. तेव्हा एक अंध स्त्री स्पर्शानं ताजमहाल पाहत, अनुभवत होती. तिलाही रक्षकांनी हटकलं होतं, असं आज इतक्या वर्षांनंतरही (१९७३) ... चाळीस वर्षांनंतरही आठवतं याचं कारण स्त्रियांचं आपल्या समाज मनीमानसी असलेलं एक अदृश्य अस्पृश्यत्वच !

 साधा घरात होणारा मुलीचा जन्म काय अवकळा पसरवून जातो... स्त्रीसही स्त्रीजन्माचं दु:ख, स्त्री-भ्रूणहत्येस स्त्रीची संमती 'Charity begins at home' न्यायानं स्त्रीमनानं आपलं दुय्यमत्व झुगारायला हवं. हा प्रेरक बदल स्त्रीत होईल तर जगाचा चेहरा बदलायला मूलभूत स्वरूपाचं साहाय्य होईल. मुलगा/मुलगी वाढीतला घरातला भेदभाव, पक्षपातीपणा नाही का आपणास कमी करता येणार? घरातल्या कामांचं स्त्री-पुरुषी विभाजन विषमता व अत्याचार म्हणून जोवर आपण पाहणार तोवर प्रेरक बदल कसे होणार? पूर्वी स्त्री उंब-याच्या आत होती, अशिक्षित होती, मिळवती नसायची तोवर घरातलं स्त्रीनं करणं आणि बाहेरचं पुरुषांनी करणं असं विभाजन एकवेळ न्यायसंगत मानू (स्त्रीला तसं ठेवणं हा मुळात अन्यायच!) पण स्त्री शिक्षित, मिळवती झाली तरी घरकामातून, रांधा, वाढा, उष्टी

सामाजिक विकासवेध/५०