पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

की तुम्ही काय शिकला आहात? क्या पढ़ा आप ने? तर म्हणाला, ‘‘सज्जन, मैं तो निरक्षर हैं। काला अक्षर भैस बराबर! अक्षर भाई को दिया, भैंस लेकर हिमालय कूच किया। सुखी हूँ। मेरी आवश्यकताएँ है नहीं।" न राहवून मी विचारले की, ‘भाई की कोई खोज खबर ?' बोला, मैं स्थावर हो गया हूँ वह जंगम है। बेचैन रहता है। बरस में एक बार आता है मिलने। मैं नहीं जाता। उसके आने पर ही मुझे उसके भाईपन की याद आती है। वह मुझे क्या क्या चीजें लेकर आता है कभी रेडिओ, कभी मोबाईल। यहाँ रेंज ही नहीं। बेकार पड़े रहते है। उसको सुकून मिलता है। मैं भूल जाता हूँ।" हे अंतर आहे गेल्या नि वर्तमान शतकातील, सुखाचा शोध काय? तर गरजा कमी करा. नात्याचा गोफ गुंफता आला तर गुंतू नका, नपेक्षा कुंथू नका.
 जगण्याचा कुंथा सर्वांत वाईट. तुम्हाला स्वतंत्र राहता आलं पाहिजे. मी तटस्थ नाही म्हणत; पण जगण्या-जगवण्यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. मी रोज काही कामानिमित्त माझ्या स्वयंचलित दुचाकीवरून उपनगरामतून हमनगरात येतो. रोज चांगलं पाच-दहा किलोमीटर अंतर पाच दहा मिनिटांत पार करतो. मी माझ्या वेगावर, आरूढ होण्यावर बेहद्द खूष असतो. दुचाकीच्या आरशात स्वत:लाच न्याहाळत मी स्वत:वरच फिदा असतो. वाटतं जगात माझ्यासारखा सुखी कोणी नाही. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?' विचारणाच्या त्या समर्थांना सांगावंसं वाटतं की तो मीच! पण तेवढ्यात कुणाचा तरी हात मला थांबवतो. त्यालाही हमनगरात यायचं असतं; पण यायचं साधन नसतं. वाहनही नाही आणि चलनही! म्हणतो मला मागे बसत, “या नोटांनी वीट आणलाय जगण्याचा. खेड्यात होतो तेच बरं होतं. राहायचं तिथंच जगायचं. इथे रोज जगायला जावे लागते. जगणं म्हणाल तर गुलामीचं. चांगला पदवीधर आहे; पण नोकरीवर जायची वेळ निश्चित; यायची नाही. जगण्याचा काव आलाय!"

 मी शांत ऐकत गाडी चालवत असतो. तो वाटेत उतरतो. मी पुढे निघतो; पण मन माझं त्याच्यापाशी रेंगाळत राहतं. तो म्हणत होता, ‘‘माणसं शिकली तेवढी अडाणी होत गेली. तुमच्या पूर्वी दहाजणांना हात केला. कुणी नाही थांबला. तुम्हाला म्हणून हात नाही केला. तरी तुम्ही माझ्या चेह-याचा पसरलेला हात पाहिलात नि थांबलात." मी असा विचार करतो, की कोणत्या त्याच्या देहबोलीचा बोध मला झाला नि मी थांबलो ? मी तुम्हाला सांगू का? देहबोली वगैरे काही नाही. मला एक जगण्याची वाईट खोड आहे. मी काहीच म्हणजे काहीच घेऊन आलो नव्हतो. काहीच नव्हते माझ्याकडे. जात, धर्म, वंश, वर्ण, नाती, पाती, पंथ, पदर काहीच नव्हते.

सामाजिक विकासवेध/१५७