पान:साथ (Sath).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचारलं, " बाबा, तुम्ही मला शेतीतली कामं शिकवाल ?"
 त्यांनी हसून विचारलं, " काय शिकायचंय तुला?"
 तिला एकदम वाटलं की ज्या माणसानं शेती करण्यात आयुष्य घालवलं त्याला माझ्यासारख्या नवख्या शहरी बाईनं, जणू ही काय अगदी सोपी गोष्ट आहे, अशा सुरात हे विचारणं म्हणजे त्याचा अपमान करणंच झालं.
 ती घाईघाईने म्हणाली, " म्हणजे सगळं अगदी ताबडतोब शिकता येईल असं नाही म्हणायचं मला. पण शिकायला सुरुवात करायची आहे. निदान पाणी द्यायचं, खतं टाकायची, काढणी, अशा नेहमीच्या कामात मदत करण्याइतपत तरी शिकायला आवडेल मला."
 हया वेळेला त्यांचा बियाणाचा धंदा अगदी आटोपशीर होता. त्यात सुमारे वीस माणसं कामाला होती. त्यातल्या बहुसंख्य बाया होत्या. त्यांचं काम म्हणजे बी साफ करणं, ते निवडून त्यातलं खराब, फुटकं, पोचट बी काढून टाकणं, उरलेल्याला औषध लावणं, ते पिशव्यांतून भरणं आणि पिशव्यांना लेबलं लावणं. सगळी कामं हातानंच व्हायची. ज्योतीचं काम मुकादमाचं होतं, पण बरेचदा ती बायांबरोबर काम करू लागायची. कुणीतरी आपल्यासमोर काम करतंय आणि आपण रिकामं उभं राहून त्यांच्यावर नुसती देखरेख करायची, हे तिला चमत्कारिक वाटायचं. शिवाय तीही मदतीला लागली की काम तेवढंच भरभर व्हायचं. काम झालं की फावल्या वेळात ती शेतावर जायची.
 तिला वाटायचं की, हे असंच आयुष्य जगण्यासाठी तिचा जन्म झाला होता. इतकं सुख तिनं कधी कल्पनेतही अनुभवलं नव्हतं. तिच्या आईबापांच्या गर्दीदाटीतल्या दोन खोल्यांतलं आयुष्य, कदाचित अति-सान्निध्यामुळे त्यात होणाऱ्या कुरबुरी, पुढे वडिलांच्या आजारपणामुळे सगळ्यांवर पडणारी उदासवाणी छाया हे सगळं तिच्यापासून फार दूर गेलं होतं. त्यावेळची पैन् पै काळजीपूर्वक खर्च करण्याची गरज आणि त्या मानाने असलेली आताची समृद्धी यांची तुलना करून तिला अपराधी वाटायचं. पण ती

साथ : ४३