पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महिमा सांगलीचा

वरदहस्त या नगरीवरती सदा गणेशाचा
शब्दामधुनी कसा वर्णु मी महिमा सांगलीचा ॥ धृ ॥
अनेक शतकांपूर्वी वसली
कृष्णाकाठी रम्य सांगली
सहा गल्लीनी सुखात न्हाली
रंग सुखाला होता पण त्या शुभकर हळदीचा ।। १ ।।
हरभट कोणी पूर्वज पहिले
वंशज त्यांचे येथे वसले
वैभवात पटवर्धन झाले
चिंतामणि ना राजा येथील, पालक रयतेचा ।। २ ।।
सांगलीच्या या असंख्य लीला
जुन्या जाणणाऱ्यानी कथिल्या
इतिहासाच्या साक्षी झाल्या
अभिमानाने जपला ठेवा त्या गत काळाचा ।। ३ ।।
कलागुणांची नाट्यपंढरी
साधुदास ते काव्यविहारी
दिनानाथ, गंधर्व मंडळी
विष्णुदाससह देवल याना मुजरा मानाचा ॥। ४ ॥
चिंतामणीने पाया रचला
'वसंत' हस्ते कळस चढविला
नव्या युगावर ठसा उमटला
महानगरीच्या भविष्यातल्या उज्वल कालाचा ॥ ५ ॥
समाजसेवक राजकारणी
शिक्षण क्रीडा ज्ञानप्रसारणी
इथे चमकले अनेक अग्रणि
वैद्यक, शेती अनेक क्षेत्री ओघ निर्मिताचा ।। ६ ।।
अशी सांगली सदा चांगली
पुसत उणीवा सतत बहरली
पितृनगरी जी मनी कोरली
अविनाशी तो टिळक राहु दे मानस हा प्रभूचा ।। ७ ।।

- प्रभाकर द. खाडिलकर