पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 निधड्या छातीचा तो शूरवीर म्हणजे कै. वसंतदादा पाटील.
 सांगलीचा शिल्पकार म्हणून गौरविल्या गेलेल्या आणि ज्यांच्या गळ्यात चार वेळेला मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तेच हे वसंतदादा.
बालपण, जडणघडण :
 कृष्णानदीकाठी इतिहास घडवणारे वसंतदादा पाटील मूळ पद्माळे गावचे. सांगलीपासून तीन मैलावर असलेले पद्माळे गाव वसंदादांमुळे पावन झाले. त्या गावात वसंतदादांचे वडील बंडोजी पाटील आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती करत आपला उदरनिर्वाह करत होते. वसंतदादांना एक मोठा भाऊ होता. त्याचे नाव शामरावदादा. वसंतदादांपेक्षा ते चार वर्षांनी मोठे होते. वसंतदादांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई. वसंतदादांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ सालचा. आयुष्यात पुढे सांगली ही वसंदादांची कर्मभूमी झाली तरी त्यांची जन्मभूमी मात्र कोल्हापूरची. आज कुणाला माहितीही नसेल पण या वसंतदादांचे पाळण्यातील नाव ‘यशवंत होते! पुढे आणखी एका यशवंताच्या सहवासात आल्यावर, वसंतदादा खऱ्या अर्थाने पाळण्यातील नावाला शोभेसे 'यशवंत' झाले!

 आई-वडिलांचे छत्र मात्र व वसंतदादांना लाभले नाही. त्यावेळी महाराष्ट्राच्या काही भागात इन्फ्ल्यूएंझाची ( तापसरीची) साथ खूप फैलावली होती. त्याची लागण पद्माळे गावालाही झाली. छोटा वसंता अवघ्या दहा महिन्यांचा असताना आई रुक्मिणीबाई आणि वडील बंडोजी पाटील यांचा या साथीने बळी घेतला. त्यातही दुर्दैव म्हणजे अवघ्या दोन तासांच्या अंतराने दोघांचाही मृत्यू झाला. दोन्ही मुले पोरकी झाली.

६ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील