पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




आणि सांगलीत साखर कारखाना उभा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. वसंतदादांना खात्री होती की या साखर कारखान्याच्या उभारणीने शेतकऱ्यांना उर्जितावस्था येणार आहे. खरं तर सांगली परिसर हा तसा कोरडवाहू शेतीचा. तरीही वसंतदादांनी यशवंतराव चव्हाण, डॉ. धनंजयराव गाडगीळ आदी मंडळींपुढे साखर कारखान्याचा प्रस्ताव मांडला. मुख्य प्रश्न होता तो साखर कारखान्याच्या गळतीसाठी लागणाऱ्या ऊस लागवडीचा. सध्या पुरेसा ऊस नसला तरी कारखाना बांधकाम पूर्ण होईपर्यंत तो उपलब्ध करून देण्याची हमी वसंतदादांनी दिली, तेव्हा कुठे साखर कारखान्याच्या प्रस्तावाला मुंबई सरकारने मान्यता दिली. आता साखर कारखान्यासाठी पाच लाख (नंतर ते दहा लाख झाले) भागभांडवल उभे करणे ही वसंतदादांसाठी एक डोकेदुखीच होती. कारण साखर कारखान्यासाठी कच्चा माल म्हणजे ऊस. पुरेसा ऊस नसताना कारखाना कसा सुरू करणार? तिथे काय जोंधळ्याची चिपाडे घालणार काय? अशा तऱ्हेच्या शेतकऱ्यांच्या रास्त शंका असायच्या. त्यातून कारखाना काढायला परवानगी मिळाली तेव्हा दोन महत्त्वाच्या अटी घातलेल्या होत्या. एक म्हणजे दर दिवशी किमान एक हजार टन ऊस गाळला पाहिजे आणि साखर कारखाना शंभर दिवस चालू ठेवला पाहिजे. अशा अटींची वसंतदादा काळजी करत बसणारे नव्हते, पण साखर कारखान्याच्या उभारणीने शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडणार आहे याची त्यांना खात्री होती, म्हणून त्यांनी खेडोपाड्यातून भटकंती केली.

 शेतकऱ्यांना समजावले. अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांची एकत्र सभा घेतली. सरकारच्या अटी पूर्ण करण्यासाठी ऊस लागवड करणे किती

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / २७