Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सयाजीराव गायकवाड
आणि
शाहू छत्रपती

 एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय सुधारणांत महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू छत्रपती या दोन लोकोत्तर राजांचे फार मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर राजर्षी शाहूंच्या कार्याचे स्मरण महाराष्ट्राने कृतज्ञतापूर्वक जागवले आहे. राजर्षी शाहू छत्रपतींसंबंधी गेल्या तीस-पस्तीस वर्षांत मराठी लेखकांनी सातत्याने चरित्र, संशोधन, भाषणांचे खंड, गौरवग्रंथ, शाहू छत्रपतींचे निवडक आदेश आणि शाहू कालखंडातील कागदपत्रांचे प्रकाशन केले आहे. यातून शाहूंचे सर्व क्षेत्रांतील कार्य लोकांपर्यंत पोहोचले. त्या तुलनेत महाराजा सयाजीराव गायकवाड हे एक तर आम्हाला गुजरात प्रांतातील राजे वाटू लागले असावे. त्यामुळे कदाचित आजच्या फुले-शाहू- -आंबेडकर विचारांच्या मंडळींनी त्यांना सामावून घेतले नाही. तसेच इथल्या साहित्यिकांना, विचारवंतांना, चळवळीतल्या आणि राजकारणातील कर्त्या मंडळींनाही विद्यमान चौकटीत त्यांना बसविणे सोईचे वाटले नसावे.

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / ६