Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हिंदुस्थान बाहेरील बाबू तारकनाथ, मादाम कामा, श्याम कृष्ण वर्मा, बिपीनचंद्र पाल या ब्रिटिश सत्तेविरुद्ध देशद्रोही चळवळी करणाऱ्यांशी सयाजीरावांचे संधान आहे. देशद्रोही साहित्य छापण्याचे केंद्रही बडोद्यात आहे. ( Source Material १९५८, ५६१) आरोपपत्राचा शेवट करताना व्हॉइसराय म्हणाले, सयाजीराव हुशार आहेत; पण ते कोणताही ठोस पुरावा मागे ठेवत नाही. बडोद्यातील प्रो. माणिकरावांचा जुम्मादादा आखाडा देशातील क्रांतिकारकांचे आश्रयस्थान झाले होते एवढेच नाही तर माणिकराव हे महाराज आणि क्रांतिकारी चळवळींच्या लोकांमधील महत्त्वाचा दुवा होते. (महाबळ, गुरुवर्य माणिकराव, १९५७, २०२) सयाजीरावांच्या सूचनेवरून अरविंद घोष, केशवराव देशपांडे, प्रा. माणिकराव आणि खासेराव जाधव यांनी नर्मदासाठी गंगनाथ राष्ट्रीय विद्यालय सुरू केले. स्वामी ब्रह्मानंदांची त्यांना मदत झाली. राष्ट्रप्रेम, शारीरिक शिक्षण, शस्त्रांची उपासना आणि बॉम्ब तयार करण्याचे इथे प्रशिक्षण दिले जाई. (नानासाहेब शिंदे, १९३५, १०५ ) पुस्तकाच्या कव्हरवर नाव आहे 'वनस्पतीची दवाओ.' लेखकाचे नाव होते नरसिंहभाई पटेल. आत मात्र मजकूर होता बॉम्ब कसा तयार करावा. हे पुस्तक बडोद्यात छापले आहे. बडोद्यात प्रसिद्ध झालेल्या अरविंद घोषांच्या 'भवानी मंदिर' या पुस्तकाचा मजकूरही देशद्रोही ठरविला गेला. चीन, जपान, फ्रान्स, कॅनडा प्रवासातही सयाजीरावांनी देशद्रोही लोकांच्या भेटी घेतल्या, असे या अहवालात नमूद केले आहे. ( Secret File, A Banded Box Case १९१०, १०२)

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / ३९