Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्तमानपत्र सुरू करून सत्यशोधक विचारांचा प्रसार सुरू केला. सयाजीरावांचे राजवाड्यातील धर्मकृत्यासंबंधी असंबद्ध व अनिष्ट गोष्टींकडे लक्ष होतेच. धर्माच्या नावाखाली पुरोहित वर्ग अनिष्ट प्रथा वर्षानुवर्षे आंधळेपणाने लादत आहे, हेही त्यांच्या लक्षात आले. या काळात जोधपूरचे शिवदत्त जोशी बडोद्यात आले. राजवाड्यातील देवघरातील धार्मिक कृत्ये पुराणोक्त पद्धतीने होतात, हे बघून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, राजपूत क्षत्रिय आहेत. छत्रपती शिवराय राजपूत वंशाचे म्हणून क्षत्रिय ठरतात. त्यामुळे सर्व मराठ्यांच्या घरात वेदोक्त पद्धतीने धर्मकृत्ये चालली पाहिजेत. मराठ्यांना वेदांच्या पठण-श्रवणाचा अधिकार नाही असे कर्मठ सनातनी म्हणत. मराठे क्षत्रिय नसून शूद्र आहेत. त्यामुळे मराठ्यांच्या घरी धर्मकृत्ये आणि विधी वेदोक्तऐवजी पुराणोक्त पद्धतीने केले जातात. सयाजीरावांनी गो. स. सरदेसाई व काही पंडितांच्या मदतीने वेदोक्त आणि पुराणोक्त या दोन्ही पद्धती समजून घेतल्या. त्यांची खात्री झाली की, वस्तुत: या दोन्हीत कमी - अधिकपणा काहीच नाही; परंतु धर्मपंडित पहिलीला अधिक महत्त्व देतात. केवळ विधी व कर्मकांडात बुडून जाऊन आम्ही धर्माची खरी तत्त्व विसरून गेलो आहोत. समाजातील उच्च-नीचत्वाची जाणीव काढून टाकून धार्मिक दृष्टीने स्थैर्य आणणे हा एकमेव मार्ग आहे. याच

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / २९