Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



होते. ते स्वत:पेक्षा बाह्य जगाचा अधिक विचार करत, तर सयाजीराव अंतर्मुख स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांच्या अंतरंगाचा धांगपत्ता जवळच्या व्यक्तीलाही लागत नसे. (घाटे, १९६९, २८६- ७) सयाजीरावांनी बडोद्यात अगोदर जे-जे कायदे केले, , सुधारणा केल्या, तेच काही शाहूंनी कोल्हापुरात केले.
 वेदोक्त प्रकरण प्रथम बडोद्यात सुरू झाले; पण सयाजीरावांनी संयमाने ते प्रकरण हाताळले. हिंदुस्थानात मराठीत ब्राह्मणेतरांसाठी पहिली वेदोक्त पाठशाळा बडोद्यात सुरू करून हा प्रश्न सामंजस्याने सोडविला, तर शाहूंनी या प्रकरणात ब्राह्मणांविरुद्ध ठोस कार्यवाही करून तो प्रश्न धसास लावला. सयाजीराव बालपणापासून सर्वजातीपातींच्या सवंगड्यात खेळलेले. गुरे चारताना एकत्र जेवलेले.

 त्यामुळे राजा झाल्यानंतर १८७७ साली वयाच्या चौदाव्या वर्षी अहमदाबाद मुक्कामी त्यांनी पंगतीभेद दूर केला. अस्पृश्यता निवारणाचे काम स्वत:पासून सुरू करून कायद्याने अस्पृश्यता दूर करून त्यांना शिक्षण देऊन नोकऱ्या देणारे ते पहिले आहेत. शाहू छत्रपतींनी ब्राह्मणेतर चळवळ हेच एकमेव उद्दिष्ट मानल्याने, त्यांचा संघर्ष त्या काळात महाराष्ट्रात गाजला. बहुजण समाजास सयाजीराव निराकार निर्गुण ब्रह्मासारखे भासले, तर शाहू छत्रपती त्यांचे सावळे ब्रह्म झाले.

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / १९