पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.

२९


पैसे काढावे लागले. संसाराच्या खर्चास द्रव्य मिळविण्याकरितां परदेश जानें भाग पडलें. तिकडे हाल अपेष्टा त्रास व दगदग सोसून थोडेफार पैसे त्याने आणले व घरी परत आला. चार दिवस आनंदांत गेले. पण फिरून घराबाहेर पडणें प्राप्त झालें. पण आतां अशक्तपणामुळे पूर्वी- सारखे श्रम होईनासे झाले. चार वर्षांनीं तो परत देशीं येतो तों तेथें दुष्काळ पडलेला ! मुलेबाळे व बायको या दुष्काळांत मेलीं. इतके कष्ट करून शेवटीं दुःखाचें ताट वाढलेलें ! इतकें उतार वय झालें असतांना लोकांनीं तिसऱ्या लग्नाची भर दिली व या म्हाताऱ्याने सर्व द्रव्य खर्च करून लग्न केलें ! व पुन्हा द्रव्य मिळविण्याकरितां विदेशीं गेला व कांहीं काळाने परत आला. तो बायको व मुलगे यांमध्ये तंटे सुरू झालेले. पुढें वेगळे होण्याचें घाटले व वांटणीच्या बाबतींत बापलेकांची मारामारी झाली. शेवटी पंचांनीं मध्ये पडून वांटण्या करून दिल्या व म्हातारा व ती तरुण बायको निराळ्या घरांत राहूं लागलीं. पण इतक्यांत गांवावर शत्रूचें सैन्य आले व त्यानें वायकोस धरून नेलें. म्हाताऱ्यास अतोनात दुःख झालें. त्यांतच बायको वारल्याची बातमी कळली; मग त्या दुःखाला काय पारावार! सारांश त्याची जन्माची कहाणी कष्टमय झाली !
 गेलें तारुण्य गेलें वल । गेलें संसाराचें सळ ।

 वाताहत झालें सकळ । शरीर आणि संपत्ति ॥
 जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाही व्यर्थ गेला । 

 कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥

 सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी झाला |
 पुढें मागुती धोका आला । यमयातनेचा ।।

 याप्रमाणें एका कहाणीच्या रूपाने दुःखमय संसाराचें वर्णन केल्या- वर, रामदास या संसारांत भोगाव्या लागणाऱ्या तापत्रयाच्या वर्णनास लागले आहेत.
 मनुष्याच्या शरीरांत आपोआप किंवा स्वतःच्या कृतीने होणान्या रोगादिकांपासून किंवा कामक्रोधापासून होणारा ताप आध्यात्मिक ताप होय.