पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संतति-नियमन

जातें. १९२१सालच्या रिपोर्टावरून पहातां मुंबई वगैरे मुख्य शहरी बालकांच्या मृत्यूचें प्रमाण पुढें दिल्याप्रमाणे आहे. मुंबई शहरांत दूर हजारीं १५६, कलकत्त्यांत ३८६, रंगून येथे ३०३, मद्रासमध्यें २८२, कराचीस २४९, आणि दिल्ली येथें २३३ बालकें एक वर्षाचीं व्हावयाच्या आधींच मृत्युमुखी पडतात. म्हणजे मुंबईत दर दोन मुलांपैकी एक मूल वर्षाच्या आंतच नष्ट होतें. शहरांतील परिस्थिति विशेष वाईट असेल म्हणून शहरांसंबंधाचे आंकडे दृष्टिआड केले तरी सबंध देशाचे आंकडेही कांहीं कमी भयप्रद नाहींत. सन १९२१ च्या सेन्सस रिपोर्टात स्वच्छ म्हटलें आहे कीं, "ब्रिटिश इंडियामध्यें एकंदर मुत्युसंख्येपैकीं एक पंचमांश मुत्युसंख्या बालकांची असते, आणि एकंदर अर्भकांपैकीं एक पंचमांश पुरीं बारा महिन्यांची व्हावयाच्या आधींच इहलोक सोडून जातात. '
 अर्भकांचीच गोष्ट कशाला ? आमच्या देशांतील एकंदर स्त्री-पुरुषां- च्या जीवितयात्रेची कहाणी तरी काय मोठी रम्य आहे! एकीकडे पाहिलें तर हिंदुस्थानची लोकसंख्या वाढत आहे. १८९१ सालीं ती २८,७३,१४,६२९ होती; ती सारखी वाढत वाढत १९२१ सालीं ३१,८९,४२,४८० पर्यंत येऊन पोचली आहे. वर वर पहाणारास व बाह्य देखाव्यावरून विचार करणारास साहजिकपणेंच वाटेल, की ज्याअर्थी हिंदुस्थानची लोकसंख्या तीस वर्षांत जवळ जवळ तीन कोटी सोळा लाखांनी वाढली आहे, त्याअर्थी त्या देशचे लोक सुखी, दीर्घायुषी आणि आरोग्यसंपन्न असले पाहिजेत. परंतु वास्तविक स्थिति आज काय आहे? 'जगीं सर्वसूखी असा कोण आहे ?' या श्रीरामदासांच्या उत्तरगर्भ प्रश्नांतील तात्त्विक खोंच सोडून दिली, आणि केवळ खायला प्यायला ज्याला पोटभर मिळतें तो 'सर्वसुखी' अशी व्याख्या गृहीत धरून हा प्रश्न विचारला, तरी त्याचें उत्तर हिंदुस्थानापुरतें नकारात्मकच द्यावें लागणार नाहीं