पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रत्यक्ष पुरावा व आक्षेपनिरसन

३१

 इंग्लंडमध्यें संततिनियमनाचा पुरस्कार १८७६ नंतर सुरू झाला. पण फ्रान्स देशांत त्या पूर्वीच किती तरी वर्षांपासून लोक संततिनियमनासाठीं हेतुपुरःसर प्रयत्न करूं लागले होते. वरील कोष्टकावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक तर जन्मप्रमाणाबरोबरच मृत्युप्रमाणही खालीं आलेलें आहे; आणि दुसरें हें, कीं लोकसंख्येची निवळ वाढ पाहिली तर ती खुंटलेली आहे असें बिलकूल नसून ती चाळीस वर्षांपूर्वी होती तितकीच आहे. शिवाय जन्मप्रमाण कमी होत गेल्याच्या या काळांत फ्रान्स देशांतील स्त्री-पुरुषांच्या आपेक्षित आयुष्याची मर्यादा वाढतच गेलेली आहे.
 इतक्या उदाहरणांवरून जी गोष्ट आम्हांस वाचकांच्या मनावर ठसवावयाची आहे ती ही, की 'बहुप्रसवितेमुळें प्रजेची संख्या वाढते पण ती सारी कुप्रजा असते, आणि संततिनियमनानें वाढणारी लोकसंख्या सुप्रजा असते.'
 आतां आणखी एकच उदाहरण घेऊ. तें हॉलंड देशाचें. या देशाचें उदाहरण कांहीं दृष्टींनीं फार महत्त्वाचें आहे. संततिनियमना- च्या कार्यक्रमास इतर बहुतेक पाश्चात्य राष्ट्रांतील सरकारांचा जबर- दस्त विरोध आहे. अमेरिकेत तर संततिनियमनाच्या कृत्रिम साधनांचे ज्ञान करून देणें गुन्हा या सदराखाली येतें. हॉलंड देशांत मात्र सरकारची या कार्यास संमति असून तें कार्य करणारी Neo- Malthusian League नांवाची संस्था लोकहिताची संस्था म्हणून सन १८९९ पासून सरकारनें रजिस्टर केलेली आहे. याचा परिणाम साहजिकपणेंच असा झाला आहे, कीं इतर देशांत कृत्रिम साधनांचा उपयोग करून संततिनियमनाचा अंमल फक्त श्रीमंत व सुशिक्षित वर्गाकडूनच होतो तसें हॉलंडमध्यें न होतां गोरगरीबांपर्यंत देखील या ज्ञानाचा फैलाव होऊन त्यांजकडून तदनुसार आचरणही घडत आहे.