पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण तिसरें
प्रत्यक्ष पुरावा व आक्षेप निरसन

हिंदुस्थानची लोकसंख्या वाढावी अशी आपली इच्छा असती तरी त्या इच्छेच्या पूर्ततेसाठीदेखील बहुप्रसवितेचा मार्ग त्याज्यच ठरला असता; आज तर तशी इच्छा करण्यासारखीही परिस्थिति नाहीं; शिवाय बहुप्रसवितेमुळे मृत्यूचे प्रमाण वाढतें, समाजाच्या शारीरिक व द्रव्यबलाचा अपव्यय होतो आणि कुप्रजेची परंपरा सुरू रहाते; इत्यादि कारणांसाठीं सुप्रजाजननाविषयीं जर आपल्याला खरोखरच प्रयत्न करावयाचा असेल तर विवाहित स्त्री-पुरुष सत्पात्र असतील अशी खबरदारी तर आपण घेतलीच पाहिजे, पण शिवाय संततिनियमनाचें अगत्य पतिपत्नींच्या मनावर बिंबविले पाहिजे हैं। आम्ही मागील प्रकरणांत विशद केलें. परंतु या गोष्टी स्पष्ट झाल्या- नंतरही कांही लोक कदाचित् म्हणतील, की संततिनियमनाचा मार्ग तात्त्विक चर्चेपुरता कितीही सुपरिणामी दिसला तरी त्याचा प्रथम प्रयोग आमच्या देशावर करून पहाण्याचें धाडस आम्ही करणार नाहीं. अशा लोकांची भीति दूर करणें सोपें आहे. प्रगमनशील पाश्चात्य लोकांनी संततिनियमन प्रत्यक्ष आचरणांत आणून पाहिलें आहे, व त्याचें हित झाले किंवा नाहीं याचा पुरावा आपल्याला सहज मिळण्यासारखा आहे. या प्रकरणांत तो पुरावा प्रथम देऊन नंतर त्या बाबतीत उद्भवणाऱ्या दोन तीन आक्षेपांचें निरसन करण्याचे आम्हीं योजिले आहे. संततिनियमनाचा प्रयोग ज्या राष्ट्रांनी करून पाहिलेला आहे त्यांचीं उदाहरणें वाचकांनीं लक्ष्यपूर्वक पहावी.
 या बाबतींत इंग्लंडमधील परिस्थिति पहाण्यासारखी आहे. इंग्लंड- मधील जन्ममृत्यूच्या प्रमाणांच्या कोष्टकाचा कांही भाग पुढे दिला आहे.