पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनाचें अगत्य

२५

प्रकारे छाननी झालेली आहे. त्या सिद्धान्ताचें खंडण करणारे व मंडण करणारे अनेक पंडित होऊन गेले आहेत. या साऱ्या वादविवादाचा निष्कर्ष काढला, आणि मालथसच्या सिद्धान्ताविषयीं शास्त्रज्ञमंडळांत आज बहुमत काय आहे तें पाहिलें तर असें दिसतें कीं ज्या स्वरूपांत मालथसनें आपला सिद्धान्त पुढे मांडला त्या स्वरूपांत आज तो कोणालाच मान्य नाहीं. लोकसंख्येची वाढ भूमितिश्रेढीनें होते ही माल्थसची समजूत चुकीची असल्याचेच आतां बहुतेक पंडित सांग - तात. ती वाढ तशी व्हावी इतकी उत्पादनशक्ति मनुष्याच्या अंगीं संभवते हें खरें. पण या संभवाचे प्रत्यक्षांत रूपांतर होत नाहीं असा अनुभव आहे. शिवाय लोकसंख्येची वाढ भूमितिश्रेढीने झाली, तरी धनधान्यांची वाढ मात्र गणितश्रेढीनें होईल ही मालथसची कल्पनाही भ्रामक आहे. कारण चार्लस पेल यांनीं आपल्या ग्रंथांत म्हटल्या- प्रमाणें, “जमिनीची मशागत करून तिच्यांतून धनधान्य काढण्याचे काम हैं केव्हांही झालें तरी लोकच आपल्या हातांनी करणार. लोक- संख्येची वाढ झाली म्हणजे अन्न खाणारी तोंडें जशी वाढतील तसेच अन्नासाठी राबून काम करणारे हातही वाढतील यांत संशय नाहीं. अर्थात् लोकसंख्येबरोबर जवळ जवळ त्याच गतीनें उप- जीविकेची द्रव्ये वाढावयास कांहीं प्रत्यवाय नाहीं.'
 सारांश, मालथसच्या सिद्धान्तांत अतिशयोक्तीचा अंश बराच आहे. किंबहुना माल्थस स्वतःच एके ठिकाणी म्हणतो, की 'धनुष्य एका बाजूला फारच वांकलेले मला आढळल्यामुळे मलाही तें उलट बाजूला वाजवीपेक्षा फाजील वांकवावेंसें वाटलें.' प्रजाजननाविषयी लोक अगदी बेफिकिर आणि अंधदृष्टि बनलेले पाहून त्यांना झोपेतून जागृत करण्या- साठीं मालथसनें आपला सिद्धान्त अतिशयोक्त स्वरूपांत पुढे मांडला हेंच खरें. पण मालथसनें स्वतः कबूल केलेली ही अतिशयोक्ति वग- ळली, तरी जो सत्यांश रहातो त्याचे महत्त्व कांही कमी नाहीं.