पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
संतति-नियमन

यांचीं प्रमाणें परस्परावलंबी कशी आहेत व कां आहेत त्याचा सांगोपांग विचार आपण पुढील प्रकरणांत करणारच आहोंत. सध्यां आपल्याला इतकेंच पहावयाचें आहे, की जन्मसंख्येचें प्रमाण जसजसे वाढेल तसतसें मृत्युसंख्येचें प्रमाण वाढत जातें, हा जर एक निसर्ग- सिद्ध नियमच असेल, तर अंध बहुप्रसविता हें कांहीं सुप्रजाजनानाचें अमोघ साधन म्हणतां येत नाहीं. येवढेच नव्हे तर बहुप्रसवितेमुळे 'बहुप्रजा' निर्माण होईल. पण त्या प्रजेपैकीं बराच भाग अल्प- काळांतच मृत्युवश झाल्यावांचून रहाणार नाहीं. तात्पर्य, 'बहुप्रजा' व 'सुप्रजा' यांतील भेद आपण ओळखला पाहिजे. हा भेद ओळखला, आणि आजच्या परिस्थितींत स्त्री-पुरुषांनी बहुप्रसवितेचें तत्त्व अंगिकारलें तर उत्पन्न होणारी प्रजा अवगुणी आणि अल्पायुषी अशी निपजेल हें ध्यानांत ठेवले म्हणजे आज संततिनियमनाचाच उपदेश स्त्री-पुरुषांस केला पाहिजे हें प्रत्येकजण कबूल करील. विवाहाचा मूळ हेतू केवळ प्रजाजनन नसून सुप्रजाजन्न आहे याची वाचकांस आम्ही पुन्हा एकदां आठवण देतों. म्हणजे आज संततिनियमन करावयास सांगणें हें त्या मूळ हेतूच्या विरुद्ध नसून त्या हेतूस पोषकच कसें आहे तें त्यांच्या चटकन् ध्यानांत येईल; आणि ज्या संकटाची सावली हिंदी प्रजेवर पडलेली आज स्पष्ट दिसत आहे तें निवारण करण्यास संततिनियमनावांचून गत्यंतर नस- ल्यास त्याविरुद्ध व्यर्थ अढी बाळगणे वेडेपणाचें होय हें त्यांस पूर्णपणें पटेल.