पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काकांना भाकऱ्या करून खाऊ घालणाऱ्या गंगूमावशीच्या नातीसाठी बिस्किट पुडा घेतला. योगेश्वरीचे दर्शन घेऊन तो वाट चालू लागला. माथ्यावर उभ्या असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात तो शिरला. दगडवाडी अल्याडच्या वाघाळपिंपळ्यांचे बुधाजीअण्णा गळ्यात विणा अडकवून भजन गात होते. पहारा देत होते. मंदिरापलिकडच्या भागातून पखवाज घुमवल्याचा आवाज आला आणि त्याचे पाय थबकले. तो आठवित होता. तेव्हा त्याच्या बाप्पांची इच्छा होती त्याला कीर्तन शाळेत घालण्याची. अंकुशचा गळा मधुर होता. तो भजन सुरेखपणे गाई. पण खूप खूप शिकण्याची ओढ असलेल्या अंकुशने त्यांची इच्छा दूर ठेवली. आज मात्र क्षणभर त्याला वाटून गेले की, बाप्पांचे ऐकले असते तर पोट भरण्यासाठी घर, जमीन, म्हातारे.... लंगडे काका यांना सोडून मुंबई गाठावी लागली नसती. त्याचे पाय आपोआप मंदिराकडे वळले. दर्शन घेतांना आपल्या परिसरात आल्याची निवांत तृप्ती त्याला सुखावून गेली. आणि तो पायऱ्या उतरून खालच्या पटांगणात आला. तिथे पखवाज शिकणारी मुले, मुक्कामाला आलेले वारकरी रहातात. मधोमध मोठे खुले सभागृह होते. तिथे शंकरअण्णा सारोळकर मुलांना घेऊन पखवाज वाजवीत होते. ते सारे दृश्य त्याने मनभरून पाहून घेतले आणि अण्णांना दंडवत घालून तो बाहेर आला. व डोंगर उतरू लागला. डोंगराचा उतार उतरून तो जयवंती, वैनगंगेच्या संगमाजवळ आला. पल्याड जाणारा पुल पार उखडून गेलाय. चपला हातात घेवून त्याने पाण्यात पाय बुडविले. वाळूतून चालायला सुरुवात केली. मन लंगड्या काकांना, गावातल्या संवगड्यांना भेटायला खूप आतुर झाले होते. दादरचे वझे कुटुंब मुंबईतल्या गोष्टी सारे मागे-मागे पडत गेले. त्याने मनात पक्के ठरविले. पैसे साठवायचे. विहिर खणायची आणि आंज्या, सोनूला घेऊन परत आपल्या गावात यायचे. बेत रंगवित तो डोंगरातल्या रस्त्याचा चढ चढू लागला.


शोध अकराव्या दिशेचा / ८७