पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 डोईवरचा पदर आदबीने पुढे ओढून, अंगभर पदर घेऊन शेवंतबाई आणि सहा सात जणी पायऱ्या चढून ओसरीवर आल्या. थोड्या बाजूला बसल्या.
 "दादा पाण्याचे हाल तर हायेतच, पन पोरी कमी शिकलेल्या म्हणून चांगली पोरंबी मिळनात लगिन करायसाठी. आजकाल शेरातल्या पोरी शिकाया लागल्याता. सातवीपसवर तरी साळा हवी बगा." एक जण बोलली.
 "दादा पाण्याचे हाल हाईतच, पण दारूचा लई ऊत माजलाय. आज तुमी आलाव, म्हणून समदे शुध्दीवर हाईत. नायतर एव्हाना तर्रऽऽ होऊन बसणार. मंग पैशासाठी… तिखट भाजीसाठी बायकूला बदड. पोरांना मार. घरातली भांडी बासनं ईक …"दुसरीने पुस्ती जोडली.
 "व्हय माय. त्याचा बी कायतरी बंदोबस्त करा दादा." तिसरी.
 श्रीनाथने सगळे ऐकून घेतले. चोविस एप्रिलच्या मोर्चात गावातील झाडून सर्वांनी सामिल होण्याचे आवाहन केले. भाकऱ्या बांधून आणायला सांगितले. रात्री 'बदलाव' चे कार्यकर्ते मंगळावारातल्या शिवाप्पांच्या घरात जमले. सर्वच खेड्यातल्या अडचणी सारख्याच होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन कोस चालून पाणी आणायचे. खेडी ओस पडत चाललेली. मोर्चातील मागण्याचे निवेदन तयार केले आणि काहीशी लांबलेली बैठक संपली.
 श्रीनाथ घरी पोचला तेव्हा रात्रीचे दोन वाजून गेले होते. तो आत आला आणि घड्याळात दोनचे टोल पडले. आजची बैठक खूप लांबली. तहसील मोमिनाबादला असल्याने मोर्चा मोमीनाबाद ऊर्फ अंबाजोगाईत… आंब्यातच निघणार होता. तेथील कार्यकर्त्यानी झुणका, चटणीची जबाबदारी घेतली होती. महाविद्यालयातले प्राध्यापक, विद्यार्थी जोमाने कामाला लागले होते. गेल्या चार पाच वर्षात श्रीनाथने चांगला गट तयार केला होता. पाच पंचवीस पोरं हां हां म्हणता जमा होत. शासनाला जाब विचारणाऱ्यांची, अभ्यास करणाऱ्यांची आणि संघर्षाला तयार असणाऱ्यांची फळी निर्माण व्हायला हवी असे श्रीनाथला नेहमी वाटे. त्याची ही सुरूवातच जणु.

 अनू गाढ झोपली होती. श्री ने तिच्या डोळ्यावरचा चष्मा काढून खिडकीत ठेवला. हातातलं पुस्तक काढून शेल्फमध्ये ठेवलं. आणि त्याने दिवा मालवला. पण डोळ्यासमोर डोक्यावर दोन दोन घागरी घेऊन चढ चढून येणाऱ्या बाया, खोल विहिरीत बारक्या पोरीला उतरवून, वाटी वाटीने पाणी भरून वर ओढल्या जाणाऱ्या घागरी आणि मरण मागणारी ती म्हातारी माय… आलटून पालटून येत होते.


शोध अकराव्या दिशेचा / ४२