पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ग्रंथालयासमोरच्या व्हरांड्यात उभी राहून रोजच्या प्रमाणे आजही ती गुंराचे कळप पहातेय. तिची नजर आभाळाकडे गेली. निरभ्र, निस्तेज कोरडं फटफटीत आभाळ. कोऱ्या करकरीत कपाळासारखं. उदासवाणं!
 …काळ्याभोर ढगांच्या खिल्लारांचे बलदंड थवे, एकमेकांना ढुशा देत मनमानेल तसे चौखुर धावणारे, गेल्या तीनचार वर्षात कुठे हरवले आहेत देव जाणे! ते धावणारं सावळं आभाळ, ढगांचा गडगडाट… विजांचे भयचकित करणारे तांडवनृत्य आणि मग गंधवती धरतीला सर्वागांनी भेटणारा असोशी पाऊस… कुठे गायब झाला तो मातीचा वेदून टाकणारा गंध?... मेहताब मामूने वाजवलेल्या टोलाने अनू भानावर आली. तिच्या लक्षात आले की तिने मस्टरवर… प्राध्यापकांच्या हजेरी वहीवर सही ठोकलेली नाही. ती वेगाने स्टाफरूमकडे गेली, मस्टरवर सही केली आणि घाईघाईने बी.ए.तृतीय वर्षाच्या वर्गात शिरली. डोळ्यासमोर कवितेच्या ओळी फिरु लागल्या.

घिरघिरत्या घारीच्या
पंखांच्या सावल्या
दुपारच्या पारी
मुक्या ढोरांसभोवार
विक्राळ पंखांची
पंखजड गिधाडं
सुन्नाट दुपारी ....
डोळ्यात उन्हाचे
भयाण कोरडेपण
फाल्गुन काळी
निरभ्र
मातीचे सौभाग्य लोपले
कोरड्या कपाळी.

 "मॅडम, मॅडम".... मुलांच्या कलकलाटाने ती भानावर आली. सात आठ मुलं उठून उभी राहिली होती. त्यांच्या डोळ्यात अस्वस्थ काहूर. सांगायचंय पण कसं सांगावं, असा भाव. क्षणभर तिलाही कळेना काय झालंय ते.

 "कंटाळा आला असेल, मन कवितेत शिरत नसेल तर वर्गाच्या बाहेर जा. 'माझ्या तासाला याच' असं आवतण दिलं नव्हतं मी." ती वैतागाने तट्कन बोलली. एवढ्यात सुनीता धिटाईने म्हणाली,


शोध अकराव्या दिशेचा / १०