पत्नीकडे साड्या किती आहेत? शेतकरी आंदोलन त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे दोन जुनी लुगडी एकत्र शिवून वापरले जाते. तुमच्याकडे घालायला दोनच चांगले शर्ट आहेत आणि दोनच धड साड्या आहेत अशी वेळ आली म्हणजे आपण तुमच्या परिस्थितीचाही विचार करू. दुधाचे भाव वाढल्याने लहान मुलांचे दूध कमी करावे लागेल याची चिंता अनेकांना वाटते. पण दूध उत्पादक शेतकरी क्वचितच घरच्या पोराबाळांकरता कपभर दूध ठेवतो याची जाण कोण ठेवतो!
भारत व इंडिया यातील असमतोल दूर करावयाचा असेल तर भारतातील परिस्थिती सुधारावी लागेल. क्वचित इंडियातील परिस्थिती काही प्रमाणात अनाकर्षक करावी लागेल, त्यात बिघडले कोठे? शहरी वाढीने निर्माण होणारे प्रश्न सोडवायला त्याने मदतच होईल. ज्वारीला व भाताला योग्य भाव मिळाला तर झोपडपट्ट्यांचा आणि फुटपाथवासीयांचा प्रश्न सोडविता येईल - अन्यथा नाही.
या एकूण कार्यक्रमात, मला वाटते सर्वच ग्राहकांचा एक मोठा फायदा होणार आहे. प्रचलित व्यवस्थेत उत्पादन वाढल्यावर त्यातून तयार होणारे उत्पन्नाचे स्त्रोत प्रस्थापितांकडेच जातात. ऊस वाढला, उत्पन्न गेले मधुमेहाच्या रोग्यांकडे आणि ३० टक्के लोकांना साखर पाहायला नसली तरी ओरडा होतो अति उत्पादनाचा. अगदी प्रकांड पंडित अर्थशास्त्रसुद्धा या कांगाव्यात सामील होतात.
क्रयशक्तीच्या विस्तारामुळे देशातील बाजारव्यवस्थेत मोठा फरक पडू शकेल. मर्यादित बाजारपेठेसाठी मर्यादित उत्पादन करायचे व दर वस्तूमागे जास्तीत जास्त नफा मिळवायचा ही आजची सरकारनीती आहे. त्याऐवजी उद्योजकांना उत्पादन जास्तीत जास्त करून दर वस्तूमागे किमान फायदा घेऊन विक्री वाढविण्याची नीती स्वीकारावी लागेल आणि त्यातून कारखानदारी मालाच्या किमती उतरताना दिसू लागतील.
■ ■