पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेलंग, काशिनाथ त्रिंबक न्यायपालिका खंड त्यावेळी त्यांचे वय जेमतेम अडतीस-एकोणचाळीस वर्षांचे होते. परंतु ते जेमतेम चार वर्षेच न्यायाधीश राहिले. त्यांच्या न्यायाधीशपदावरील कारकिर्दीत उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर आलेला सर्वांत महत्त्वाचा खटला म्हणजे आप्पाजी नरहर कुलकर्णी विरुद्ध रामचंद्र रावजी कुलकर्णी हा होय. एखाद्या एकत्र कुटुंबात आजोबा-बाप-मुलगा अशा तीन पिढ्या हयात असतील तर तिसर्‍याला, म्हणजे नातवाला पहिल्याकडून (म्हणजे आजोबाकडून) वाटणी मागता येते का, असा प्रश्न या खटल्यात न्यायालयासमोर आला. यावर न्या.तेलंगांचे उत्तर होकारार्थी होते, पण ते अल्पमतात होते. परंतु नंतरच्या काळात अनेक उच्च न्यायालयांनी न्या.तेलंगांचे मत मान्य केले. कायदा व न्याय याव्यतिरिक्त समाजकारण, राजकारण, धर्मकारण आणि अर्थकारण या क्षेत्रांतही न्या.तेलंग यांनी सक्रिय सहभाग घेऊन भरीव कार्य केले. काँग्रेसच्या स्थापनेत न्या.तेलंगांचा सहभाग होता. न्यायाधीश होण्याआधी वयाच्या छत्तिसाव्या वर्षी मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू आणि सर्वांत तरुण कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला. न्या.तेलंग आणि त्यांच्यानंतर न्या.रानडे आणि न्या.चंदावरकर या न्यायमूर्ती-त्रिमूर्तीने परस्परपूरक भूमिका निभावून महाराष्ट्राला उदारमतवादाचा वस्तुपाठ घालून दिला. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. चपळगांवकर, न्या. नरेंद्र; ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’; मोैज प्रकाशन, २०१०.

शिल्पकार चरित्रकोश