पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेंडोलकर, शामराव रघुनाथ । न्यायपालिका खंड लौकिक होता. त्यांची तत्त्वनिष्ठा व निर्भीडपणा केवळ निकालपत्रांपुरती नसे. १६जानेवारी१९७७ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश असताना नागपूर येथे जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ‘आवर ज्युडिशिअल सिस्टिम’ या विषयावर त्यांनी केलेले विचारपरिप्लृत भाषण त्यांच्या निकालपत्रांइतकेच निर्भीड आणि स्पष्टोक्तिपूर्ण होते. सर्वोच्च न्यायालयामधून निवृत्त झाल्यावर न्या.तुळजापूरकर यांनी कोणतेही सरकारी पद किंवा काम स्वीकारले नाही. भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातील एक सचोटीचे व निर्भीड न्यायाधीश म्हणून न्या.तुळजापूरकर यांचे नाव कायम घेतले जाईल, याबद्दल संशय नाही. - शरच्चंद्र पानसे

तेंडोलकर, शामराव रघुनाथ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश २१ ऑक्टोबर १८९९ - २७ मार्च १९५८ शामराव रघुनाथ तेंडोलकर यांचा जन्म कोल्हापूरला झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरला तर उच्च शिक्षण अगोदर कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात व पुढे मुंबईत एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. बी.ए.पर्यंत त्यांना अनेक बक्षिसे आणि शिष्यवृत्त्या मिळाल्या. एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर लगेच ते इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी १९२३मध्ये बेलफास्टच्या क्वीन्स विद्यापीठातून एलएल.बी.ची पदवी प्राप्त केली आणि त्याचबरोबर ते ग्रेज इन्मधून बॅरिस्टर झाले. स्वदेशी परतल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत वकिली सुरू केली. प्रथम काही काळ त्यांनी सर जमशेदजी कांगा यांच्या हाताखाली काम केले. १९३८ ते १९४१ पर्यंत ते शासकीय विधि महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक होते. त्यांना मैदानी खेळांची, विशेषत: क्रिकेटची अतिशय आवड होती. अनेक वर्षे ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. १९४७ ते १९५४ पर्यंत ते रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचे ‘स्ट्युअर्ड’ होते. वीस वर्षांहून अधिक काळ ते मूळ शाखेतील यशस्वी वकील म्हणून ओेळखले जात. २ जुलै १९४६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. न्यायाधीशपदावरून त्यांनी नागरिकांच्या हक्कांचे हितरक्षण कसोशीने केले. सरन्यायाधीश छागला व न्या.तेंडोलकर यांच्या खंडपीठाने सलग दहा वर्षे आयकर कायद्याखालील खटल्यांत महत्त्वाचे निर्णय दिले. त्यांचे हे खंडपीठ आयकर पीठ म्हणूनच ओळखले जाई. डालमिया गटाच्या कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी न्या.तेंडोलकरांची नेमणूक झाली. पण पुढे त्यांनी आयोगाचा राजीनामा दिला. न्यायाधीशपदावर असतानाच न्या. तेंडोलकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्याच्या काही दिवस आधीच मुंबई टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९५८.

तेलंग, काशिनाथ त्रिंबक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १८५० - १८९२ काशिनाथ त्रिंबक तेलंग यांचा जन्म मुंबईला झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळेमध्ये त्यांना उत्तम ७२ शिल्पकार चरित्रकोश