पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड चितळे, माधव गोविंद करता येईल. याशिवाय, १जानेवारी१९७८ रोजी एअर इंडियाच्या ‘सम्राट अशोक’ या विमानाला झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक-सदस्य आयोग म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सर्वंकष चौकशी करून त्यांनी आपला अहवाल सादर केला. जानेवारी १९८४मध्ये न्या.चांदूरकरांची मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु लगेच एप्रिल १९८४मध्ये त्यांची बदली मद्रास उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून करण्यात आली. तेथून ते १३मार्च१९८८ रोजी निवृत्त झाले. चेन्नईमधील आपल्या चार वर्षांच्या वास्तव्यात न्या.चांदूरकर तेथेही लोकप्रिय झाले व त्यांनी तेथील वकीलवर्गाचा आदर व विश्वास संपादन केला. निवृत्त होऊन मुंबईला परतल्यावर न्या.चांदूरकर लवादाचे काम करीत. अनेकदा एखादा विषय दोन लवादांकडे सोपविला गेल्यास त्या लवादाचे अध्यक्ष म्हणून न्या.चांदूरकरांची निवड होत असे. सर्वोच्च न्यायालयाने आणि कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांची काही प्रकरणांत लवाद म्हणून नेमणूकही केली होती. - शरच्चंद्र पानसे

चितळे, माधव गोविंद मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ७ जानेवारी १९१० - ५ जून १९९६ माधव गोविंद चितळे यांचा जन्म रत्नागिरीला झाला. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरी हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. बी.ए. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली आणि ती करीत असतानाच शासकीय विधि महाविद्यालयामधून एलएल.बी. पदवी संपादन केली. २२जुलै१९३७ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. त्यांनी मुख्यत: अपील शाखेत आपले चुलते जी.बी.चितळे यांच्या हाताखाली काम केले. नंतर अपील शाखेत त्यांचा स्वतंत्रपणेही चांगला जम बसला. गरजेनुसार ते अगोदर फेडरल कोर्टात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयातही खटले लढवीत असत. त्यांचे काम अतिशय काटेकोर असे. गरीब अशिलांकरिता ते प्रसंगी पदरमोडही करीत. ४नोव्हेंबर१९५४ रोजी मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २१जुलै१९६० रोजी ते त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. अनेक स्त्रियांना फसवून त्यांच्याशी लग्ने करणारा कुख्यात माधव काझी याच्यावरील फौजदारी खटला चितळे यांच्यासमोर चालला. त्यांनी काझीला दिलेली शिक्षा नंतर उच्च न्यायालयाने कायम केली. २३डिसेंबर१९६० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून चितळे यांची नियुक्ती झाली. ४ऑक्टोबर१९६१ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. ६जानेवारी१९७२ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. उच्च न्यायालयात असताना त्यांनी दिलेले दोन महत्त्वाचे निर्णय विशेष उल्लेखनीय आहेत. पहिला, कॉरोनर मलकानी खटल्यातील निर्णय; यात त्यांनी आरोपीचे ध्वनिमुद्रित संभाषण पुरावा म्हणून ग्राह्य आहे असा निर्णय दिला. (तो नंतर सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला.) दुसरा, भिवंडी-निजामपूर नगरपालिका खटल्यातील निर्णय; यात न्या.चितळे यांनी ‘गुड फेथ’ या संज्ञेचा अर्थ ‘मॉरल अपराइटनेस’ असा लावला. उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर न्या.चितळे चार वर्षे मुंबईच्या औद्योगिक न्यायाधिकरणाचे अध्यक्ष होते. याच काळात त्यांनी गोव्यातही औद्योगिक न्यायाधिकरण म्हणून काम केले; ते करीत असताना १९७५मध्ये त्यांनी कोका-कोला तंटा सोडविला. न्या.चितळे यांचा मुंबईतील अनेक शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध होता. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९९६.

शिल्पकार चरित्रकोश