पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोमण, भास्कर सदाशिव संरक्षण खंड |महायुद्ध संपल्यानंतर जगभर विखुरलेली सैन्यदले आणि त्यांची सामग्री मायदेशी रवाना करणे सुरू झाले. ब्रिटिश सैन्यदलाची कामे ‘सी ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन’ या संघटनेमार्फत करण्यात आली व सोमण त्यामध्ये साहाय्यक वाहतूक अधिकारी म्हणून काम करू लागले. २६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांची नेमणूक ‘ड्राफ्टिंग कमांडर ऑफ नेव्ही’ या पदावर झाली. त्यानंतर कमांडरच्या हुद्द्यावर बढती मिळाली. १९४६ मध्ये मुंबईतील नौदल उठावाच्या वेळी मुंबईत त्यांनी धीरोदत्त भूमिका घेेतली. त्याच सुमारास त्यांची कॅप्टन या हुद्द्यावर बढती झाली. स्वतंत्र भारतामध्ये नौसेना अधिकारी आणि जवानांच्या मनुष्यबळ विकासाबाबतच्या अभ्यासामुळे ‘चीफ ऑफ पर्सोनेल’ म्हणून भास्कर सोमण यांची नौसेना मुख्यालयात बदली झाली. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली. नाविक दलाच्या मालमत्तेची भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटणी होत असताना सोमण यांचे योगदान महत्त्वाचे होते. नौसेनेच्या आधुनिकीकरणाचा पाया घालताना नौसेना उभारणी, मनुष्यबळ विकास, पुरवठा व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष भर दिला. डायरेक्टर ऑफ पर्सोनेल, चीफ ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अशा विविध पदांवर नौसेना मुख्यालयात काम केल्यावर तेे पुन्हा सागरी आघाडीवर गेले. पुढे सोमण यांची बदली एच.एम.आय.एस. जमना या जहाजावर कमांडिंग ऑफिसर म्हणून झाली. पुढे ७ ऑक्टोबर १९५१ रोजी आय.एन.एस. दिल्ली या त्या वेळच्या सर्वांत मोठ्या युद्धनौकेवर ते कमांडिंग ऑफिसर म्हणून गेले; पण दोनच महिन्यांनी त्यांची बदली आय.एन.एस. सिरकार्सवर झाली. पूर्व किनार्‍यावर कार्यरत असताना विशाखापट्टणम हे गौण मानले गेलेले अविकसित बंदर, अग्रगण्य व प्रमुख नाविकतळ बनू शकेल हे त्यांच्या लक्षात आले. भारताच्या पूर्व किनार्‍याच्या संरक्षणाचा हा बालेकिल्ला आहे हे त्यांनी जाणून त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलली. कोचीच्या परिसरातील आय.एन.एस. वेंडुतुथीवर त्यांची कमांडिंग ऑफिसर म्हणून १२जानेवारी१९५४ रोजी बदली झाली. त्याचप्रमाणे ते कोची बंदराचे कमोडोर-इन-चार्ज झाले. या पदावर ते ध्वजाधिकारी होते. ते कोचीत असताना भारतात विखुरलेल्या नौसेनेच्या सर्व विशेष शिक्षणसंस्था कोचीत आणण्याचा आणि नौसेनेचे स्वत:चे विमानदल (नेव्हल एव्हिएशन) उभारण्याचा भारतीय नौसेनेने निर्णय घेतला. ह्या दोन्ही बाबी मूर्त स्वरूपात आणण्यात सोमणांनी मौलिक योगदान दिले. मुंबई बंदराचे कमोडोर-इन-चार्ज म्हणून त्यांनी १९५६ ते १९५७ दरम्यान काम पाहिले. याच सुमारास ते रिअर अ‍ॅडमिरल झाले. गोवामुक्तीसाठी पार पडलेल्या ‘ऑपरेशन विजय’ (१९६१) मधील यशस्वी कामगिरीनंतर सोमण यांची वाटचाल सर्वोच्च पदाकडे होऊ लागली. गोवामुक्ती मोहिमेत तत्कालीन भूसेनेचे दक्षिण विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल जितेंद्रनाथ चौधरी यांच्याबरोबर सोमण यांनी चढाईचा आराखडा बनवला होता. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इंडियन फ्लीट (फोसिफ) म्हणून त्यांची दि.१६ एप्रिल १९६० रोजी नियुक्ती झाली होती. देशातील सर्वांत मोठ्या युद्धनौकेवरून फोसिफ आपला कार्यभार सांभाळतो. सोमण यांनी आय.एन.एस. म्हैसूरवरून कार्यभार सांभाळला म्हणून त्यांना ‘फोसिफ म्हैसूर’ असे संबोधण्यात आले. आय.एन.एस. विक्रांत नौसेनेत दाखल झाल्यावर त्यांचे पद ‘फोसिफ विक्रांत’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘फोसिफ’ म्हणून त्यांनी २६ महिने कार्यभार सांभाळला. एप्रिल १९६०मध्ये ते व्हाइस अ‍ॅडमिरल असतानाच भारतीय नौसेना प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जून १९६६मध्ये ते सेवानिवृत्त झाले. - शशिकांत पित्रे/अविनाश पंडित

  • * *

शिल्पकार चरित्रकोश । स