पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ग । न्यायपालिका खंड गजेंद्रगडकर, प्रल्हादाचार्य बाळाचार्य लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील जानेवारी १९५७ ते मार्च १९६६ या कालखंडाला ‘गजेंद्रगडकर युग’ असे सार्थपणे म्हणता येईल. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यावर लगेचच न्या.गजेंद्रगडकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यावेळी ते पद पगारी नसून मानसेवी (ऑनररी) होते. ही धुरा त्यांनी साडेपाच वर्षे यशस्वीरीत्या सांभाळली. याच दरम्यान त्यांनी महागाई भत्ता आयोग, जम्मू-काश्मीर चौकशी आयोग, राष्ट्रीय कामगार आयोग आणि बनारस हिंदू विद्यापीठ चौकशी आयोग यांच्यावरही काम केले. यानंतर ते कुलगुरूपदावरून निवृत्त झाल्यावर सहाव्या आणि सातव्या विधि आयोगांचे (लॉ कमिशन) अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याशिवाय ते रिझर्व बँकेच्या आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या संचालक मंडळांचे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य आणि दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे एक विश्वस्तही होते. दिल्लीच्या इंडियन लॉ इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ, इत्यादी संस्थांशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता. मदुराई येथील गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाचे ते पहिले कुलपती होते. मुंबई आणि पुण्यातील अनेक संस्थांशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे आणि रामकृष्ण मिशनच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष होते, तर पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीचे आणि इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्ष होते. मुंबईच्या राष्ट्रीय संगीत-नाट्य केंद्राच्या (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्) नियामक मंडळाचेही ते काही काळ सदस्य होते. न्या.गजेंद्रगडकर यांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीत रस होता आणि सामाजिक सुधारणेच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभागही असे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या काळातील सामाजिक परिषदेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न महर्षी कर्वे, रँग्लर परांजपे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इत्यादी मंडळींनी केला. त्यात न्या.गजेंद्रगडकर यांचाही सहभाग होता. या प्रयत्नांचा भाग म्हणून १९५३मध्ये पुण्याला आणि १९५४मध्ये जळगावला महाराष्ट्र सामाजिक सुधारणा परिषद भरली. या दोन्ही परिषदांचे अध्यक्षस्थान न्या.गजेंद्रगडकर यांनी भूषविले होते. न्या.गजेंद्रगडकर यांनी आपल्या वकिलीच्या काळातच नंदपंडित याच्या ‘दत्तकमीमांसा’ या ग्रंथाची सानुवाद चिकित्सक आवृत्ती प्रसिद्ध केली होती आणि तिची प्रशंसा झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील आपल्या दीर्घ कारकिर्दीच्या काळात न्या.गजेंद्रगडकर यांनी अनेक ठिकाणी विविध विषयांवर विद्वत्तापूर्ण व्याख्याने दिली. त्यांतील बहुतेक पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. त्यापैकी ‘लॉ, लिबर्टी अ‍ॅन्ड सोशल जस्टिस’(१९६५), ‘ट्रॅडिशन अ‍ॅन्ड सोशल चेंज’(१९६६), ‘इम्परेटीवज् ऑफ इंडियन फेडरेशन’(१९६९), ‘सेक्युलॅरिझम अ‍ॅन्ड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडीया’(१९७१), ‘इंडियन पार्लमेंट अ‍ॅन्ड फंडामेंटल राइट्स्’(१९७२) आणि ‘लॉ, लॉयर्स अ‍ॅन्ड सोशल चेंज’(१९७६) या पुस्तकांचा विशेष उल्लेख करता येईल. आपल्या जीवनाच्या संध्याकाळी न्या.गजेंद्रगडकर यांनी आणखी एक महत्त्वाचे कार्य हाती घेतले आणि ते जवळजवळ पूर्ण केले. ते म्हणजे भारतीय विद्याभवनाच्या दशोपनिषद प्रकल्पाच्या प्रमुख संपादकपदाचे. त्यांच्या नेतृत्वाखालील संपादक मंडळाने दहा प्रमुख उपनिषदांचे मूळ श्लोक, त्यांवरील शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य आणि वल्लभाचार्य या चार आचार्यांचे भाष्य आणि या सर्वांचे सटीप इंग्रजी भाषांतर असे ग्रंथ सिद्ध केले. यातील आठ उपनिषदांचे काम न्या.गजेंद्रगडकर असेपर्यंत पूर्ण झाले होते. ‘टु द बेस्ट ऑफ माय मेमरी’ हे न्या.गजेंद्रगडकरांचे वाचनीय आणि उद्बोधक आत्मचरित्र त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी, म्हणजे शिल्पकार चरित्रकोश ४५