पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भूमिका


 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील चौथा खंड वाचकांच्या हाती देत असताना आम्हांला आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीची ओळख करून देण्यापासून भविष्यकालीन महाराष्ट्राचा वेध घेण्यापर्यंत या प्रकल्पाची व्याप्ती आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान व भविष्य यांसंबंधी एक व्यापक जाणीव महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने वाचकांसमोर ठेवत आहोत.
 आधुनिक नागरी समाजव्यवस्थेची न्यायपालिका, प्रशासन व संरक्षण ही महत्त्वपूर्ण अंगे आहेत. घटना ही आधुनिक समाजव्यवस्थेच्या अस्तित्वाचा दस्तऐवज असतो. राज्यसंस्था व नागरिक आणि नागरिकांमधील परस्परसंबंधांची निश्चिती घटनेद्वारे होत असते. राज्याचे प्रशासन या घटने अंतर्गत चालविणे ही प्रशासनावरील प्रमुख जबाबदारी व हे प्रशासन कायद्यानुसार कार्यरत आहे, हे पाहण्याची जबाबदारी न्यायपालिकेची असते. समाजवादी समाजरचनेत प्रशासन चालविण्याबरोबरच एक राजकीय सिद्धान्त अमलात आणण्याची जबाबदारी प्रशासन यंत्रणेवर पडली की त्यातून तिचे स्वरूप सर्वंकष बनते. त्यामुळे त्याच्यात अनेक त्रुटी आहेत. एकेकाळी आपल्या समोर येणाऱ्या खटल्यांच्या संदर्भात कायद्याचा अर्थ लावणे एवढीच आपली जबाबदारी आहे, असे न्यायालय मानते. परंतु आता कायद्याचे रक्षण करण्यासंदर्भात ती अधिक सक्रिय बनली आहे. संरक्षण व तिचे राजकीय स्वरूप हीदेखील आधुनिक संकल्पनाच आहे. या तीनही संकल्पना ब्रिटिश राजवटीपुरत्या आपल्या समाजात रुजल्या आणि आता त्या भारतीय समाजाच्या अंगभूत घटक झाल्या आहेत. गेल्या २०० वर्षांत या तीनही क्षेत्रात असलेला ब्रिटिश वारसा आपल्याकडे घेऊन त्यावर आपला विशिष्ट ठसा उमटविण्याची कामगिरी या क्षेत्रातील ज्या ज्या महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांनी केली त्यांची माहिती या खंडाद्वारे आम्ही वाचकांपुढे ठेवीत आहोत.

 न्यायपालिका खंडाकरिता शरच्चंद्र पानसे यांना आम्ही संपादन करण्याची विनंती केली व या कार्यासाठी त्यांनी सहर्ष संमती दिली. तसेच या खंडासाठी निवृत्त न्या. नरेंद्र चपळगांवकर यांनी वेळोवेळी संदर्भासाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. प्रशासन खंडासाठी डॉ. माधव चितळे, शरद काळे, सूर्यकांत जोग, अरविंद इनामदार, प्रभाकर करंदीकर, श्रीधर जोशी, लीना मेहेंदळे, प्रभाकर कुकडोलकर, बबन जोगदंड यांचेही अनमोल सहकार्य लाभले. याबरोबरच संरक्षण खंडासाठी निवृत्त लेफ्ट. जनरल शेकटकर, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, विनायक अभ्यंकर, अविनाश पंडित यांनी सहकार्य केले त्याबद्दल आभारी आहोत. सदर खंडाच्या तिनही भागांसाठी ज्या मान्यवर तज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून दिल्या त्याबद्दल त्यांचेही आभारी आहोत. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्वयंप्रेरणेने किंवा आमच्या विनंतीला मान देऊन विविध विषयांतील तज्ज्ञ, पुरस्कर्ते आणि ग्राहक यांचे सहकार्य लाभले आहे, लाभत आहे; त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. अशा प्रकारचा प्रकल्प भरीव अर्थसाहाय्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या प्रकल्पासाठी प्रमुखतः निर्माण ग्रुप ऑफ कंपनीज, दि सारस्वत को-ऑप. बँक तसेच या खंडासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे विशेष अर्थ सहाय्य करण्यात आले. त्यामुळे हा प्रकल्प थोडा अधिक काळ घेऊन का होईना पण निश्चितपणे पूर्ण होईल, असा विश्वास आम्हाला आहे.


-दिलीप करंबेळकर

शिल्पकार चरित्रकोश

न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण / ३