पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्यायपालिका खंड

एल्फिन्स्टन, माऊण्टस्टुअर्ट

 शिक्षण एडिम्बर्ग येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा कोणी नातेवाईक ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळावर असल्याने माउंटस्टुअर्टला भारतातील कंपनी सरकारात नोकरी मिळाली. १७९६ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ते कोलकात्याला आले. तेथे पाच वर्षे वेगवेगळ्या कनिष्ठ जागांवर काम केल्यावर त्यांची नेमणूक दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडंटचा सहायक म्हणून झाली. नंतर त्यांनी जनरल वेलस्लीचा सहायक म्हणून काम केले. वसईच्या लढाईत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. १८०४ मध्ये त्यांची नेमणूक नागपूर येथे भोसले दरबारातील ब्रिटिश रेसिडंट म्हणून झाली. नंतर १८०७ मध्ये ते काही काळ ग्वाल्हेर येथे होते. १८०८ मध्ये त्यांना ब्रिटिश राजदूत म्हणून अफगाणिस्तानात पाठविले गेले. दोन वर्षांनी परत आल्यावर आणि एक वर्ष कोलकात्यात राहिल्यावर १८११ मध्ये त्यांची नेमणूक पुण्याला पेशवे दरबारात रेसिडेंट म्हणून झाली. १८१७ मध्ये खडकीच्या लढाईत एल्फिन्स्टन यांनी ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व केले. पेशव्यांचा पराभव झाला आणि पेशवाई समाप्त झाली. १८१८ मध्ये एल्फिन्स्टन यांची नेमणूक दख्खनचा आयुक्त म्हणून झाली. वर्षभरानंतर, १८१९ मध्ये त्यांची नेमणूक मुंबईचा गव्हर्नर म्हणून झाली. त्या वेळी मुंबई इलाख्यात आज पाकिस्तानात असलेला सिंधचा भाग, आजचा गुजराथ, आजचा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील काही जिल्हे असा विस्तीर्ण प्रदेश समाविष्ट होता.
 १८१९ ते १८२७ अशी आठ वर्षे एल्फिन्स्टन मुंबईचे गव्हर्नर होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील आणि एकंदर पश्चिम भारतातील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्था त्याचप्रमाणे कायदा आणि न्यायव्यवस्थेचा पाया घातला.

 जगातील ज्या ज्या प्रदेशांवर ब्रिटिशांनी राज्य केले, तेथे सर्वत्र त्यांनी कायद्याच्या राज्याची स्थापना केली, असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. भारतही त्याला अपवाद ठरला नाही. जसजशी भारतात ब्रिटिश सत्ता विस्तार पावून स्थिरावू लागली, तसतशी कायद्याचे राज्य स्थापन करण्याची निकड त्यांना जाणवू लागली. कायद्याच्या राज्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे लिखित स्वरूपातील, सर्वांना समजण्यायोग्य, कलमवार तरतुदी असलेले, म्हणजेच संहिताबद्ध (कोडिफाइड) कायदे अस्तित्वात असणे आणि अशा कायद्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवून, त्याचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी, त्याचप्रमाणे व्यक्तींना आपल्या तक्रारींची दाद मागून न्याय मिळविण्यासाठी एक सुव्यवस्थित न्यायालय व्यवस्था अस्तित्वात असणे. महाराष्ट्रासह पश्चिम भारतात या दोन्ही गोष्टींचा प्रारंभ एल्फिन्स्टन यांनी केला.

 मुंबईचे गव्हर्नर झाल्यानंतर एल्फिन्स्टन यांनी वर सांगितलेल्या दोन्ही गोष्टी साध्य करण्याच्या उद्देशाने, त्या वेळी या प्रदेशात प्रचलित किंवा लोकमान्य असलेले नियम, रूढी, प्रथा, संकेत, परंपरा इत्यादी लक्षात घेऊन व काही नवे नियम तयार करून त्यांची विषयवार व कलमवार मांडणी करून घेतली, म्हणजेच त्यांना संहिताबद्ध केले. दुसरे म्हणजे, या सगळ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालये स्थापन केली. या दोन्ही गोष्टी मुख्यत: दिवाणी स्वरूपाच्या होत्या. या न्यायालयांच्या स्थापनेची तरतूदही त्याने या संहितेतच केली. या सर्व संहितेला त्यांनी ‘बॉम्बे कोड ऑफ रेग्युलेशन्स्’ असे नाव दिले. याला ‘एल्फिन्स्टन कोड’ असेही म्हणण्याचा प्रघात आहे. यामध्ये एकूण सत्तावीस नियम होते.

 ही अर्थातच सुरुवात होती. काळाच्या ओघात, साधारण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, आणखी अनेकानेक कायदे झाले आणि त्यामुळे एल्फिन्स्टन यांच्या कोडमधील अनेक तरतुदी रद्द करण्यात आल्या. मात्र त्यातील काही तरतुदी अशा प्रकारे रद्द न झाल्यामुळे आजमितीसही अस्तित्वात असून, घटनेच्या कलम ३७२ नुसार त्या तरतुदी कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहेत.


शिल्पकार चरित्रकोश