पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड बोंगिरवार, लक्ष्मण नारायण व ओसाड टेकड्यांचे वनीकरण करणार्‍या समितीचे ते अध्यक्ष होते. श्रीधर बूट यांचे प्रशासकीय कार्य, वनविकासाचा अभ्यास, महाराष्ट्र राज्याची वनसमृद्धी व त्यावर आधारित उद्योगांची उन्नती व महाराष्ट्राला तसेच पर्यायाने देशाला मिळवून दिलेला महसुलाच्या रूपाने आर्थिक लाभ या सर्व कार्यासाठी भारतीय वन संस्था (सोसायटी ऑफ फॉरेस्टस्) यांच्या वतीने दि.७ नोव्हेंबर १९९४ रोजी डेहराडून येथे त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. देशातील फक्त पाच लोकांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात सुंदर फुलझाडे लावून सुशोभीकरणाची कल्पना श्रीधर बूट यांची होती. येथील पर्यटनस्थानी ‘प्रताप गार्डन’ विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. श्रीधर बूट यांनी मेळघाट विभागात ‘कोलखास’ या ठिकाणी शिल्पा नदीसमोर मोठे आधुनिक विश्रामधाम बांधले. तसेच ‘ताडोबा’ अभयारण्यात पर्यटकांसाठी पंचतारांकित विश्रामगृह उभे केले. मुंबईत बोरिवलीतील ‘उपवन’ विकसित करण्यात श्रीधर बूट यांचा मोठा वाटा होता. तसेच तेथून जवळच तुलसी, विहार व पवई या तिन्ही सरोवरांच्या सानिध्यात अत्याधुनिक विश्रामधामसुद्धा बांधले. सुंदर कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याचा तसेच फुले व फुलझाडांचा श्रीधर बूट यांना छंद होता. तसेच छायाचित्रे काढण्याची आवड होती. श्रीधर बूट यांचे पुणे मुक्कामी निधन झाले. - आशा बापट बोंगिरवार, लक्ष्मण नारायण नियोजनसचिव-महाराष्ट्रराज्य, पहिलेकुलगुरू-पंजाबरावदेशमुख कृषीविद्यापीठ २१ जुलै १९१७ - ३ जून १९७९ लक्ष्मण नारायण बोंगिरवार यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी या गावी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि ते ‘स्कूल इन्स्पेक्टर’ म्हणून निवृत्त झाले. त्यांची आई शांतीबाई चौथी पर्यंत शिकलेली होती. ती आपल्या मुलांसोबतच गरीब व हुशार अशा दोन तरी विद्यार्थ्यांना कायम आपल्या घरी ठेवून घेत असे. त्यांचे मोठ्या आनंदाने संगोपन करीत असे. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करावी हे आई-वडिलांचे ध्येय होते. लक्ष्मणरावांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात एम.एस्सी.पदवी संपादन केली आणि पुढील शिक्षणाकरिता दक्षिणा शिष्यवृत्ती मिळवली. स्पर्धा परीक्षेमार्फत ते त्या वेळच्या मध्य प्रदेश सरकारच्या सेवेत अतिरिक्त साहाय्यक आयुक्त या पदावर १९४१ मध्ये रुजू झाले. त्यांचा सुरुवातीचा सेवाकाळ विदर्भ भागात बुलढाणा, रामटेक, गोंदिया व नागपूर येथे व्यतीत झाला. गोंदियाला ते अधिकारी (फूड ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. १९४८ मध्ये पोलीस कार्यवाहीद्वारे निजामाचे राज्य भारतात विलीन केल्यावर लक्ष्मणरावांची नेमणूक नागरी प्रशासक या पदावर हिंगोली येथे झाली. त्यांनी या भागाला देशाच्या यंत्रणेत सहभागी करून घेण्याची प्रशासकीय कामगिरी उत्तमरीत्या पार पाडली. स्वातंत्र्योत्तर काळात आय.सी.एस्. सेवेचे रूपांतर शिल्पकार चरित्रकोश ३०१