पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड जोशी, श्रीधर दत्तात्रय एक द्विसदस्य समिती नेमली. श्रीधर जोशी त्यांतील प्रमुख सदस्य होते. सदर समितीने नांदेड, बुलढाणा, उस्मानाबाद, धुळे व रायगड जिल्ह्यांचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल तयार केले व त्यानुसार या जिल्ह्यांत प्रकल्प राबविण्याकरिता ग्रामीण विकास संस्था स्थापन करण्यात आल्या. या धर्तीवरचा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत राबविला जात आहे. श्रीधर जोशी यांनी केलेले हे काम म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास संस्थेची पायाभूत रचना होती असे म्हणता येईल. १९७६ मध्ये श्रीधर जोशी यांची नियुक्ती मुंबई येथे उपजिल्हाधिकारी, करमणूक कर शाखा या पदावर झाली. मुंबईतील काही हॉटेल्समध्ये ‘कॅब्रे डान्स’ चालत असत व तेथे येणार्‍या प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन मोजके खाद्यपदार्थ दिले जात असत. याच काळात मुंबईत ‘डिस्को डान्स कल्ब’ सुरू झाले होते. क्लबचे सभासद होण्यासाठी मोठी सभासद फी आकारली जात असे. कॅब्रे डान्स व डिस्को डान्स ही करमणूकच आहे व तेथे प्रवेश करणार्‍यांवर करमणूक कर लावला जाणे आवश्यक आहे. जोशी यांनी ही गोष्ट शासनाच्या प्रथमच लक्षात आणून दिली व त्या प्रयत्नांतूनच पुढे डिस्को व कॅब्रे डान्सवर नियमितपणे करमणूक कर आकारला जाऊ लागला. याचप्रमाणे मुंबई रेसकोर्सवर प्रवेश दिला जात असे. वार्षिक वर्गणी ही प्रवेश फीच आहे म्हणून त्यावरही जोशी यांच्या प्रयत्नामुळे करमणूक कर लावला जाऊ लागला व त्यामुळे शासनाच्या महसुलात भर पडली. देशातील आणीबाणी संपवून १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्याच वेळी श्रीधर जोशी यांची नेमणूक उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर झाली. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ व ३४ विधानसभा मतदारसंघ येथे राज्यांतील इतर जिल्ह्यांप्रमाणे तालुकास्तरांवर यंत्रणा नसल्याने निवडणुकीची संपूर्ण व्यवस्था जिल्हा निवडणूक शाखेसच करावी लागे. मुंबईतील निवडणुका सुरळीतपणे पार पाडणे हे एक मोठे आव्हान असते. जोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन लोकसभेच्या व दोन विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जोखमीची जबाबदारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्‍यांच्या सहकार्याने समर्थपणे पार पाडली. १९८० मध्ये पुलोदची सत्ता जाऊन राज्यात काँग्रेसचे सरकार आले व बॅ. अ.र.अंतुले मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांना ऊर्जामंत्री म्हणून घेण्यात आले. शासनाने जोशी यांची ऊर्जामंत्र्यांचे खाजगी सचिव या पदावर नियुक्ती केली. या पदावर कार्यरत असताना विधानमंडळाचे कामकाज, मंत्रिमंडळाच्या बैठकी, धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया यांसंबंधीची मौलिक माहिती जोशी यांना मिळाली व त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडली. १९८२ मध्ये अंतुले सरकार गेले. जयंतराव टिळक विधान परिषदेचे अध्यक्ष झाले. यामुळे जोशी यांची सक्षम अधिकारी, नागरी कमाल जमीन धारणा, मुंबई या पदावर नियुक्ती झाली. या पदावर सुमारे सहा महिने काम केल्यावर त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी, रोजगार हमी योजना, या पदावर नियोजन विभागात नेमणूक झाली. १९७९ पासून भारतीय प्रशासन सेवेत त्यांना पदोन्नती देण्यात आली व नियोजन विभागात उपसचिव म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. राज्याची पंचवार्षिक व वार्षिक योजना तयार करण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. राष्ट्रीय विकास परिषदेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याचे विकासविषयक प्रश्न मांडण्यासाठी भाषण करावयाचे असते. त्या भाषणाचा मसुदा तयार करण्याची संधी जोशी यांना प्राप्त झाली. त्याचप्रमाणे राज्याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेसंबंधी संपूर्ण माहिती झाली. योजनांतर्गत तरतूद व अंदाजपत्रकात केलेली तरतूद यांचा मेळ त्वरित घेता यावा या उद्देशाने शिल्पकार चरित्रकोश २४९